पोतराज

    भारतामध्ये आजही सण, उत्सव, विधी, रूढी यामधून मातृदेवता उपासनेचे अवशेष दिसतात. अगदी साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतदेखील मातृदेवतेचे संदर्भ आढळतात. स्त्रीशक्तीला आदिमानवाने उत्पत्ती, स्थिती, लय स्वरूपात पहिले. महाराष्ट्रामध्ये ‘मरीआई’ (लक्ष्मीमाता) या ग्रामदेवतेचे उपासक म्हणजे ‘पोतराज’ आढळतात. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील ‘पोत्तुराजु’ या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु म्हणजे रेडा/ बकरा आणि त्याचा बलीविधी पार पाडणारा तो पोतराज. एखाद्याचे मूल जगत नसल्यास मूल जगले तर ते देवीला वाहण्याचा नवस करतात. हे लक्ष्मीआईला नवसाचे सोडलेले मूल म्हणजेच पोतराज.

    सर्वसाधारणतः पूर्वास्पृश्य जमातीमधील लोक पोतराज झालेले दिसून येतात. त्यातही मांग लोकांचे प्रमाण जास्त आहे. हे लोक पुरुष असले तरीही त्यांच्या वेशभूषेत देवतेची चिंन्हे आढळतात. यांचे केस वाढलेले असून त्याचा अंबाडा बांधलेला असतो. अंगात सदरा असला तरी त्याखाली घागऱ्याप्रमाणे वस्त्र असते. या घागऱ्याला कमरेजवळ वेगवेगळ्या रंगाचे खण लोंबत सोडलेले असतात. कमरेला सैलसर घुंघराची माळ असते. पायात खुळखुळ्या असतात ( दगडी खडे असणारे पोकळ पितळी वाळे). गळ्यात कवडीच्या माळा असतात. कपाळाला हळद कुंकू वापरून मळवट भरलेला असतो. हातामध्ये चामडी कोरडा असून त्याचा सट् सट् आवाज उमटवीत त्याचबरोबर कमरेवरील घुंघुरमाळ आणि पायातील वाळ्यांचा लयबद्ध आवाज करीत ते चालतात. त्यांच्या वस्त्रांना ‘आभरान’ ‘अबरान’ असे म्हटले जाते.

    सर्व पोतराजांचे मूळ आंध्र प्रदेशात आहे असे मानले जाते. आंध्र प्रदेशातील मदगी, मादगूड समाजाचे हे लोक असतात. या पोतराजांचे ढोबळमानाने तीन प्रकार मानले जातात – स्थानिक, देऊळवाले आणि गाणी म्हणणारे.

स्थानिक पोतराज त्यांच्या ठराविक भागात मंगळवार आणि शुक्रवार या देवीच्या मानलेल्या वारी चक्कर मारतात. आसूडाचे फटके अंगावर ओढून घेत भिक्षा मागतात. देऊळवाल्या पोतराजासोबत मरीआईचा मुखवटा ठेवलेला देव्हारा असतो. डफ वाजवणारा एक साथीदारसुद्धा असतो. या बाईच्या गळ्यात एक ढोलकीसदृश्य वाद्य असते. त्याच्या तालावर पोतराज आसूडाचा आवाज काढतो आणि कमरेच्या घुंगुरमाळेचा, पायातील वाळ्यांचा लयबद्ध आवाज करत मरीआईच्या नावाने आरोळ्या ठोकत भिक्षा मागतो. या पोतराजांमध्ये आत्मक्लेशाचा स्तर जास्त असतो. पाठीवर कोरडे मारून घेणे, दंडाला दोरी बांधून त्यातून दाभण खुपसणे, स्वतःच्या मनगटाला चावा घेणे असे प्रकार हे पोतराज मरीआईला प्रसन्न करण्यासाठी करतात.

    गाणी गाणारे पोतराज निरनिराळी आख्याने, मुंबादेवीची आख्याने, पंढरपूरचा तुकडा सांगतात. तसेच मरीआई, तुळजापूरची भवानी, अंबाबाई कोल्हापूर निवासिनी यांची गीते गातात. हे लोक ‘मरीआय लक्ष्मीआईचं मदन’ अशी हाक घालून भिक्षा मागतात. यजमानीण बाईने सूपात धान्य, करंडा ठेऊन दिले तर ते सूप धान्य न पाडता तिरके धरून गिरक्या मारतात. याला अर्थातच शास्त्रीय पाया आहे पण शिक्षणाच्या अभावी लोकांना तो देवीचा चमत्कार वाटतो.

    पूर्वी पावसाळा सुरु होताना (आषाढ महिना) अनेक साथीच्या रोगांचा उद्रेक होत असे. पटकी, महामारी असे हे रोग असत. देवीची अवकृपा झाली असे समजून त्यावेळी ही महामारी पोतराजांची मिरवणूक काढून वेशीबाहेर काढली जात असे. पोतराजाच्या डोक्यावर देऊळ ठेऊन कडुनिंबाचा पाला कमरेला बांधून ही मिरवणूक वेशीबाहेर जात असे. येथे पोतराज पापवाहकाची भूमिका पार पाडत असे.

    अहमदनगरजवळ वरखेड येथे चैत्री पौर्णिमेला पोतराजांची मोठी यात्रा भरते. येथे लक्ष्मीआईचे मंदिर आहे. येथेच पोतराजांचा दीक्षाविधी होतो. त्याला ‘बढाण’ म्हणतात. गुरुसमान पोतराज नव्या पोतराजांना विधिपूर्वक दीक्षा देतात. त्यावेळी ‘धुपात्री’ आणि ‘वह्यांमधील गाणी’ म्हणली जातात. पूर्वी येथे बळी देण्याची संख्या बरीच जास्त होती. आता कालानुरूप गोडाचा, दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो.

    कमरेभोवती लक्तरे बांधून, चाबकाचे फटकारे मारीत भिक्षा मागणारा पोतराज मागील अनेक पिढ्यांनी पाहिला. जन्मतःच भटके आयुष्य लादलेले, अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा, देवीच्या कोपाची भीती अशा सर्व परिस्थितीमध्ये सध्याच्या पोतराजांच्या मनाची प्रचंड घुसमट होत आहे. आसूडामुळे होणाऱ्या जखमा त्यांचे पोट भरण्यासही असमर्थ ठरत आहेत. मरीआईचा कोप होईल या भीतीने म्हणून आईवडील वसा टाकू देत नाहीत तर पोतराजाचे आयुष्य जगून पोटदेखील भरत नाही अशा कात्रीत आजचे पोतराज जगत आहेत.

    परंपरेने लादलेले जोखड झुगारून, पोतराजपण टाकून काही जणांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबला आहे. त्यांची मानसिक कुचंबणा काही प्रमाणात कमी झाली असली तरीही कुठेतरी मरीआईच्या कोपाची अनामिक भीती बाळगून ते आयुष्याला समोर जात आहेत.

    पोतराज परंपरेचा सांस्कृतिक वारसा जपतानाच त्यांच्यातील माणूसपण जपण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. काही अंशाने काळी किनार असलेले त्यांचे हे जीवन सुसह्य व्हावे यासाठी ‘पोतराज निर्मूलन अभियान’सारखे कार्यक्रम राबवून त्यांना प्रमुख समाज प्रवाहाचे घटक बनवणे अत्यंत गरजेचे आहे.

Theme: Overlay by Kaira