औट घटकेचा राजा – शिराळशेट

    शंकराची निस्स्सिम भक्ती आणि दातृत्व यांचा संगम असणारा श्रियाळशेठ पूर्वीचे ‘कांतावली’ आजचे परळी वैजनाथ येथे होऊन गेला. शिराळशेट, शंकरोबा, सक्रोबा हे त्याचेच अपभ्रंश.nत्यालाच ‘औट घटकेचा राजा’ असे देखील म्हणतात. जसजसे खेड्याकडे जावे तशी बोली भाषा बदलते आणि श्रियाळशेठचे शिराळशेट ,शंकरोबा ,सक्रोबा अशी नावे ऐकू येतात. 

   भारतामध्ये निरनिराळ्या राज्यांमध्ये विविध प्रथा परंपरा जपल्या जातात. एखाद्या विशिष्ट दिवशी एखाद्या प्रथेचे आवर्जून पालन केले जाते. तशीच ही शिराळशेटची प्रथा. महाराष्ट्रामध्ये बारामती जिल्ह्यातील काऱ्हाटी येथे, तसेच पुणे जेजुरी, अहमदनगर अशा काही ठिकाणी हा ‘शिराळशेटीचा उत्सव’ श्रावण शुद्ध षष्ठीला साजरा केला जातो. या निमित्ताने ह्या श्रियाळशेठच्या धर्मशीलतेची आणि दातृत्वाची उजळणी केली जाते आणि मानवतेचे दर्शन घडविले जाते.

    या प्रथेमागील कहाणी मोठी मनोरंजक आहे. काही ठिकाणी या श्रियाळशेठचा शिवलीलामृतातील श्रियाळ राजाशी संबंध जोडतात,परंतु ते सर्वस्वी चुकीचे आहे कारण या शिराळशेट उत्सवाची परंपरा १३९६ नंतर अस्तित्वात आली आहे. आणि शिवलीलामृतामधील श्रियाळ राजाची कथा पुराण काळातील आहे. शिराळशेठच्या कथेतील वाणी औदार्यासाठी प्रसिद्ध आहे तर पुराणातील श्रियाळ राजा वचनपालन आणि शंकराची भक्ति यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात, शंकराची भक्ति तसेच दातृत्व हे दोन्ही गुण त्या दोघांमध्ये सामान असल्याने पुराणातील श्रियाळ राजाचे नाव नंतरच्या शेठला दिले असावे.

    इ. स. १३९६ ते १४०८ या वर्षांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे भयंकर दुष्काळ पडला. हा दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. . पाऊस नाही,पाणी नाही,अन्नधान्य नाही. लाखो लोक अन्नान्नदशेने मेले तर कित्येक जण पोटासाठी स्थलांतरित झाले. या काळात बहामनी राजवट होती आणि मेहमूदशाह बहामनीचे राज्य होते. हा राजा प्रजाहितदक्ष होता असे म्हटले जाते. या राजाने गुलबर्गा, बिदर, कंधार, दौलताबाद .एलिचपूर,चौल आणि दाभोड या ठिकाणी अनाथालये सुरु केली होती. 

    त्याच्या राज्यात ‘श्रियाळशेठ’ नावाचा लिंगायत वाणी होता. हा वाणी मोठा उदार होता ,तसेच शंकरावर त्याची नितांत श्रद्धा होती. रयतेचे होणारे हाल या वाण्याला पाहवेना तेव्हा त्यानेआपली सर्व संपत्ती विकून टाकली आणि लमाणांच्या करवी बैलांच्या पाठीवरून धान्य आणून दुष्काळ पीडितांना मोफत वाटले. याच श्रियाळशेठचे नंतर शिराळशेठ असे नाव पडले. त्याच्या गरिबांना आणि दुष्काळपीडितांना मदत करण्याच्या कृतीने मेहमूदशहा भारावून गेला. त्याने शिराळशेठला दरबारात बोलावून घेतले, आणि काय इच्छा असेल ते मागण्यास सांगितले.

    हा शिराळशेट चतुर तर होताच पण गरिबांचे, पीडितांचे भले करण्याची त्याची मनापासून तळमळ होती. राजाने काय हवे ते मागण्यास सांगीतल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःसाठी ढब्बू पैसाही न मागता औट घटका (साडेतीन तास) राज्याचे अधिकार मागून घेतले. मेहमूदशहा बादशहाने त्याची ही मागणी आनंदाने मेनी केली आणि राजमुद्रा त्याच्या हवाली केली. तेवढ्या औट घटकेचा काळात त्याने जप्त केलेली अनेक हिंदू मंदिरे व त्यांची खालसा झालेली उत्पन्ने राजमुद्रा उमटवून मुक्त केली. तसेच अनेक जमिनी आणि इनामे ,जमिनी परत केल्या. त्याच्या या कृतीने बादशहा खुश झाला आणि त्याने शिराळशेठच्या मुलाला सरदारकी बहाल केली. त्या सर्व घटनेची आठवण म्हणून श्रावण शुद्ध षष्ठीला हा शिराळशेटीचा उत्सव साजरा करतात.

    या उत्सवामागील पार्श्वभूमी अशी असली तरी काही गोष्टी यामध्ये उगीच घुसडल्या असाव्यात असे वाटते. त्या काळातील मुस्लिम राजे इतके उदारमतवादी आणि प्रजाहितदक्ष अजिबातच नव्हते. उलट प्रजेकडे काय असेल ते ओरबाडून घेण्याची त्यांची वृत्ती होती. प्रजा संकटात असेल ती तर त्याच्यासाठी पर्वणी असे जास्तीत जास्त प्रजेला नाडून आपले उखळ पांढरे करून घेण्यात हे बादशहा तरबेज होते. परंतु याचा अर्थ असा नाही की शिराळशेटीची कथा सत्य नाही,. ही कथा सत्यच आहे फक्त त्याच्या डोक्यावर जो बादशहाचा वरदहस्त असल्याचे सांगतात, ते निराधार आहे. साडेतीन घटकात आपल्याकडील सर्व विकून शिराळशेटने गरजवंतांना वाटून टाकले, हा त्या कथेतील गर्भितार्थ आहे. त्याच्या मनाचे राजेपण लोकांनी जाणले होते आणि त्याला ‘औट घटकेचा राजा‘ असे म्हटले होते.

    पूर्वी पुण्यामध्ये श्रावण महिनाभर बऱ्याच ठिकाणी शिराळशेटचा मातीचा पुतळा बसवला जात असे. हा पुतळा आतून पोकळ असे तसेच त्या पुतळ्याला पोटाच्या जागी मागून मोकळे ठेवले जाई . त्यात लाकडी भुसा ,ढलप्या पेटविले जाई आणि त्याचा धूर शिराळशेटच्या चिलीमीतून बाहेर येत असे. खरे तर चिलीम वगैरे ओढणे असे मुसलमानी शौक देखील त्याला नव्हते, काळाच्या ओघात काही गोष्टी त्याच्या संदर्भात चुकीच्या मांडल्या गेल्या. शिराळशेट हा एक परोपकारी, उदार दुसऱ्याचे दुःख पाहून व्यथित होणारा लिंगायत वाणी होता. तो अतिशय सज्जन आणि सहृदय होता. अशा या परोपकारी, सज्जन व्यक्तीचेच स्मरण आवर्जून केले जाते आणि त्याच्या दातृत्व, औदार्य या गुणांची महती सांगितली जाते. 

    आजही ज्या ठिकाणी शिराळशेटीचा उत्सव साजरा करतात, त्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी कुंभाराच्या घरी रिकामा पाट नेऊन देतात. कुंभार त्यावर शिराळशेटीचा महाल बनवितो, त्यात धान्याने भरलेली मातीची भांडी,असतात, त्या सर्वांवर बसलेला शिराळशेट याची स्थापना करतात.  या सर्वांचे विधिवत पूजन केले जाते. संध्याकाळी गावातील लोकांना तीर्थप्रसादाला बोलावतात.आणि नंतर याचे गणपतीप्रमाणे पाण्यात विसर्जन केले जाते. विसर्जनाची मिरवणूक निघते. यावेळी शिराळशेटचा पाट डोक्यावर घेतलेला असतो आणि ‘शिराळशेट वाण्या, वाटी खोबऱ्याच्या गोण्या’ असा जयघोष केला जातो.

   अहमदनगरमध्ये या उत्सवाच्या निमित्ताने जत्रा भरविली जाते,त्याला ‘पचंबा ‘म्हणतात. या ठिकाणी मिठाईची संध्याकाळी आलेले लोक शिराळशेटीचे दर्शन घेतात आणि प्रसाद घेऊन घटका दोन घटका मजा करतात. एक उत्साह, आनंद घेऊन परत घरी जातात. खंडोबा हा शिवाचाच अवतार असल्याने जेजुरी येथे देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केवळ जातो. शेतातील माती, कामट्या वापरून शिराळशेतीचा महाल बनविला जातो .पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे हा महाल डाळी, करडई, गुंजा वापरून सजविला जातो. आतमध्ये शिराळशेटीची धान्याने भरलेली मातीची भांडी असतात. त्यावर मातीने बनविलेल्या शिराळशेटीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मंदिरातील सदरेवर आरती करून कोळी समाजातील ‘लांघी’ कुटुंबातील व्यक्ती हा पाट डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा करते आणि तेथे असलेल्या ‘चिल्लाळाची विहीर’ येथे आरती करून त्याचे विसर्जन केले जाते. या प्रथेचे पालन करताना वेगवेगळ्या समाजातील विशिष्ट मान दिल्याचे दिसते. ‘वीर दांगट’, ‘घडशी’ या समाजातील तरुण या समयी ढोल आणि सनई वाजवितात. तर गुरव पुजाऱ्यांकडे पूजेचा मान आहे. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावी देखील शिराळशेटीची प्रतिष्ठापना होते. पूजा होते. मिरवणूक निघते. या ठिकाणी संध्याकाळी सर्व जाती धर्माच्या स्त्रिया एकत्र येतात. झिम्मा खेळतात,फुगडी खेळतात पारंपरिक गाणी म्हणून फेर धरतात. नंतर शिराळशेटीचे विसर्जन होते.

   या सर्व उत्सवांमधून शिराळशेटीच्या औदार्याची, दातृत्वाची महती लोकांच्या मनावर ठसविली जाते. चुकून पर्जन्यराजाने चालू साली दगा दिला तर आपल्याजवळ असेल ते गरजवंताला देऊन सर्वांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न आपण करावा असा संदेश त्यामधुन दिला जातो.

    भारत देशामध्ये अनेक प्रथा,परंपरा यांचे काही विशिष्ट दिवस साधून पालन केले जाते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी जरा विसाव्याचे क्षण अनुभवले जातात. आणि भारतखंडामध्ये होऊन गेलेल्या व्यक्तीचे स्मरण जागविले जाते!

Theme: Overlay by Kaira