शैलपुत्री

शैलपुत्री ही नवदुर्गेमधील दुर्गेचे पहिले रूप. नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी या दुर्गेचे स्मरण, अर्चन, पूजन केले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून ही शैलपुत्री. हेमवती, उमा हीदेखील हिचीच नावे. ही शैलपुत्री म्हणजे पूर्वजन्मीची प्रजापती दक्षराज कन्या सती. 

एकदा दक्षराजाने एक मोठा यज्ञ आरंभला. परंतु सतीला यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. कारण शंकर भस्म ल्यायलेला भणंग! माहेरी मोठा यज्ञ चालू आहे हे समजल्यावर सतीचे मन तिकडे ओढ घेऊ लागले. शंकराने परोपरीने तिला समजावून सांगितले की निमंत्रण नसताना जाणे उचित नाही. तरीही यज्ञविधी पाहण्याची उत्सुकता, आई बहिणींना भेटण्याची अनावर ओढ निर्माण झाल्याने ती माहेरी गेली. तिथे गेल्यावर मात्र तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. बहिणीने तर भस्मचर्चित स्मशानवासी शंकराची यथेष्ट चेष्टा केली. फक्त आईने मात्र प्रेमाने विचारपूस केली. दक्ष राजाच्या तोंडूनदेखील शंकराबाबत तिरस्कृत शब्द उच्चारले गेले. हा सर्व अपमान सहन न होऊन सतीने स्वतःला योगाग्नीमध्ये जाळून घेतले. याची खबर शंकराला मिळताच त्यांनी आपल्या गणांना पाठवून प्रजापतीच्या यज्ञाचा नाश केला. 

याच सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्या स्वरूपात जन्म घेतला आणि ती शैलपुत्री प्रथम दुर्गा म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचे वाहन बैल असून डोक्यावर अर्धचंद्र आहे. उजव्या हातात त्रिशूळ तर डाव्या हातात कमळ आहे. वाहन वृषभ असल्याने तिचे वृषारुढा असे नामाभिधान झाले. तिच्या उजव्या हातातील त्रिशूळ त्रिगुणात्मक शक्तीचे (सत्त्व-रज-तम) प्रतीक आहे तर कमळ पवित्रता, सुंदरता, सद्भावना, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. तिच्या डोक्यावर विराजमान असणारा अर्धचंद्र तिची चंद्रावर असणाऱ्या सत्तेचे निदर्शक आहे. सर्व प्रकारची सुख संपत्ती देणारा ग्रह तो चंद्र. आणि या चंद्रावर राज्य करणारी ती शैलपुत्री. 

शैलपुत्रीच्या उपासनेमुळे मूलाधार चक्र जागृत होते. तिची आराधना केली असता मन शैल म्हणजे पाषाणाप्रमाणे कणखर व टणक बनते. मनातील आत्मविश्वास, निर्भयता वाढीत लागते. विपरीत परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची विजिगिषु वृत्ती वाढीस लागते. पिवळा रंग या देवीचा विशेष आवडीचा असून तिला गाईचे तूप अर्पण केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. चंद्राची अधिपती असल्याने तिला नैवेद्यासाठी पांढऱ्या रंगाचे पदार्थ वापरले जातात. 

वंदे वंछित लाभाय चंद्रार्धकृत शेखरा ।

वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्वीनीम् ।।

या विशेष श्लोकाने तिची उपासना केली जाते. आजच्या करोना साथीने भयभीत झालेल्या सर्व जणांनीच शैलपुत्रीची उपासना मनाच्या खंबीरतेसाठी करावी. वाराणसी येथील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हेच सांगितले होते. 

अशी आहे ही,

प्रथम दुर्गा त्वं हि भवसागर: तारणीम् ।

धनऐश्वर्यदायिनी शैलपुत्री प्रणम्याभम् ।।

चला तर मग नवरात्राच्या मंगल पर्वामध्ये शक्ती उपासना करताना प्रथम दिनी जागर करू या शैलपुत्रीचा!

शिवरुपा विश्ववाहिनी हिमकन्या शुभांगिनी ।

पद्मत्रिशूल हस्तधारिणी रत्नयुक्ता कल्याणकारिणी ।।

Theme: Overlay by Kaira