शनिभक्तांची पंढरी – शनी शिंगणापूर

Shingnapur

   आपल्या अमर्याद सूर्यमालेत  महत्वाचे स्थान असणारा शनी ग्रह मानवी जीवनात खूप समजुती -गैरसमजुतींची वादळे निर्माण करतो. बरेच लोक त्याची उपासना भक्ती करतात, परंतु त्यामध्ये भक्तिभावाचा अंश कमी असून, शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचण्याचा उद्देश असतो. नवग्रहांची एकत्रित मंदिरे आपल्याला दिसून येतात. पण शनी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्याला शनिदेव म्हणून संबोधले जाते आणि त्याची स्वतंत्र मंदिरे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. भक्तलोक कायम या शनी तीर्थस्थानांना आपले दोष निवारण्यासाठी भेटी देत असतात. 

   अहमदनगर जिल्ह्यात सोनईजवळ शनी शिंगणापूर ही अशीच एक शनिभक्तांची पंढरी आहे. हे गाव शनीचे अत्यंत जाज्वल्य स्वयंभू देवस्थान मानले जाते. सभोवताली नेवासा, शिर्डी ,चांदा अशी क्षेत्रे असणारे हे शनी देवस्थान भक्तलोकांनी  कायम गजबजलेले असते.

   मंदिरामध्ये शनिदेवाची ५ फूट ९ इंच उंचीची एक शिळा असून तिलाच शनिदेवाची मूर्ती मानले जाते आणि पूजा केली जाते. या मंदिराचे वैशिष्ष्ट असे की शनिदेव तर आहेत पण देऊळ नाही. उघड्यावर एक चौथरा असून त्यावर ही शिळा स्थापन केली आहे. हा चौथरा देखील एका व्यापाऱ्याने नवसपूर्ती म्हणून बांधला आहे. दुसरे वैशिष्टय असे की या चौथऱ्याला छत नाही. निवारा नाही. शनी महाराजांना सावली (छाया ) चालत नाही. छाया या त्याच्या लेखी फक्त आई म्हणूनच. त्यामुळे त्यांची मूर्ती (शिळा) कायम ऊन,पाऊस, थंडी , झेलत उभी असते. सावली नाही म्हणजे अगदी झाडाची देखील सावली चालत नाही. या चौथऱ्याच्या बाजूला एक  कडुनिंबाचे झाड असून त्याची एखादी फांदी जरी मूर्तीच्या डोक्यावर  आली तर वाळून जाते, शुष्क होते अथवा गळून पडते .

   या मूर्तीविषयी सांगताना लोक असे म्हणतात की सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ही शिळा पुरात वाहत गावाजवळ आली . रात्री एका गावकऱ्याला दृष्टांत झाला की मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा. तेव्हा तिथे या शिळेची स्थापना शनिदेवाचे प्रतीक म्हणून करण्यात आली.

   शनी जयंती (वैशाख अमावस्या) आणि चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी येथे मोठी यात्रा असते. स्वतः शनी महाराजांचे या गावात वास्तव्य असल्याचे मानले जाते. खुद्द शनिदेवांचा येथे निवास असल्याने या गावात चोरी होत नाही. येथील घरांना दारे नाहीत. पडदे लावले जातात.कोणत्याही घराला,अगदी बँकेला देखील कुलूप लावले जात नाही. येथे चोरी करणाऱ्यास अंधत्व येते असे मानले जाते. तसेच चोरी करणारा जिवंतपणी या गावाची हद्द ओलांडू शकत नाही असेही सांगतात.

   येथे शनिदेवाचे दर्शन घेताना स्नान करून ओलेत्याने घ्यावे असा नियम आहे. स्नानाची व्यवस्था मंदिरात आहे. वस्र देखील काळ्या अथवा निळ्या रंगाचे असते. तसेच ते शिवलेले नसते,  तर लुंगीप्रमाणे नुसते गुंडाळले जाते. शनीची पूजा करताना तीळ तेलाचा मूर्तीला अभिषेक केला जातो. काळ्या अथवा निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केले जाते. जांभळ्या रंगाची फुले वाहिली जातात. शनीची लोखंडी प्रतिमा पूजेसाठी घरी नेली जाते. येथून घोड्याची लोखंडी नाल घरी नेण्याची प्रथा आहे. ही नाल घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर ठोकली तर बरकत येते अशी समजूत आहे. तसेच दृष्टिबाधा निवारणासाठी काळीबाहुली,  बिब्बे अशा वस्तूंचा येथे व्यापार चालतो. आपल्यावरील साडेसातीचा प्रभाव कमी व्हावा म्हणून खूप लोक येथे काळे उडीद आणि मीठ अर्पण करतात. सन २०१७ पर्यंत येथे फक्त पुरुषच चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेऊ शकत होते परंतु २०१७ च्या गुढी पाडव्याला भूमाता ब्रिगेडच्या मुख्य कार्यकर्त्या ‘तृप्ती देसाई’ यांच्या नेतृत्वाखाली काही महिलांनी चौथऱ्यावर जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेतले. आणि माताभगिनींना शनिदर्शनाचा मार्ग मोकळा केला. 

   असे हे शनिदेवांचेअनोखे गाव, शनिमहाराजांबद्दलच्या अनेक समजुती, परंपरा जपत, जुन्यासोबत काही नव्या गोष्टींचा स्वीकार करत आज देखील अनेक भक्तांना आकर्षित करत आहे. संसार तापाने  पोळलेल्या त्यांच्या मनावर फुंकर घालून त्यांना शांतवित आहेत!

One thought on “शनिभक्तांची पंढरी – शनी शिंगणापूर

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira