श्राद्धकर्त्यासाठी काही नियम

श्राद्ध हा विधी आपल्या पूर्वजांना सद् गती लाभावी म्हणून करण्यात येणारा विधी आहे. हा विधी करीत असताना खालील नियम पाळावेत असे शास्त्र आहे. हे नियम पळून श्राद्ध केले तरच त्याचा उपयोग होते,नाहीतर ते करणे व्यर्थ आहे.

१) श्राद्धविधी करताना शुचिर्भूत असावे . भोजनासहित श्राद्ध असल्यास विधीला माध्यान्ही (दुपारी १२ वाजता) प्रारंभ करावा.

२) श्राद्धविधीसाठी लोखंडी साहित्य, उपकरणी वापरू नये. भांडी,पूजेसाठी वापरण्यात येणारी उपकरणी पितळी अथवा तांब्याची असावी.

३) श्राद्धविधी करताना श्राद्धकर्त्याने शरीरावर तेलाचा वापर करू नये.

४) श्राद्धविधी करताना पान ,तंबाखू, गुटखा इ . काही तोंडात असू नये.

५) दुसऱ्याच्या घरातून आणलेल्या अन्नाचा उपयोग करून श्राद्ध, तर्पण आदी विधी करू नयेत.

६) श्राद्धविधी मध्ये अत्तराचा वापर वर्ज्य आहे.

७) आपल्या कुटुंबामधील व्यक्तीचे श्राद्ध दुसऱ्या कोणाच्या वास्तूत करू नये.

८) श्राद्धविधीपूर्वी श्राद्धकर्त्याने दूध ,फळे असा सात्त्विक आहार घ्यावा. मांसाहार अथवा मद्यपान करून श्राद्धविधी करू नये.

९) पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात अथवा कोणत्याही तीर्थस्थानी करावे.

१०) श्राद्धविधी चालू असताना रागावणे, भांडणे, अपशब्द वापरणे निषिद्ध आहे.

११) उपलब्ध साहित्यामध्ये श्राद्धविधी करावा. त्यासाठी कर्ज पाणी करू नये.

१२) श्राद्धाच्या दिवशी दारी येणाऱ्या याचकाला विमुख पाठवू नये, त्याचा अपमान करू नये. वेळेला जे असेल ते देऊन त्याचे समाधान करावे. अगदी काही नाही तर त्याला पाणी पाजावे.

१३) श्राद्धकर्त्याने प्रसाद म्हणून श्राद्धान्न सेवन केल्यानंतर रात्री भोजन करू नये. अपवादात्मक परिस्थितीत दूध अथवा फलाहार करावा.

१४) श्राद्धदिनी मोकळ्या जागेत कावळ्याची घास ठेवावा. तसेच गायीला नैवेद्य, कुत्र्याला अन्न द्यावे.

१५) आप्तेष्टाना बोलावून प्रसाद द्यावा. शक्य तितके अन्नदान करावे.

१६) सर्व झाल्यानंतर पुरोहितांची विडा, दक्षिण देऊन संभावना करावी. घरातील सर्व लहानथोर व्यक्तींनी त्यांना आदरपूर्वक नमस्कार करावा .

१७) घरातील वातावरण शांत आणि समाधानाची ठेवण्याचा प्रयत्न करावा. कुरबुरी, भांड्याची आदळआपट टाळावी.

१८) श्राद्धविधी जाताना आवश्यक तेवढे साहित्य गुणवत्तापूर्ण वापरावे. निकृष्ट आणि भारंभार साहित्याचा वापर टाळावा.

१९) सर्वात महत्त्वाचे मनामध्ये कृतज्ञता भाव ठेऊन अत्यन्त श्रद्धापूर्वक श्राद्ध करावे.

२०) अपरिहार्य परिस्थितीमध्ये थोडक्यात परंतु आटोपशीर श्राद्धविधी करावा. त्याचा लोप करू नये.

Theme: Overlay by Kaira