श्री अक्कलकोट स्वामी प्रकटदिन

    चैत्र शुद्ध द्वितीया हा ब्रह्माण्डनायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन. श्री स्वामी समर्थ साधारणतः १८५६ ते १८७८ अक्कलकोट येथे होते.

    चैत्र शुद्ध द्वितीया. शके १७७८ अनल नाम संवत्सर .रविवार ०६/०४/१८५६ या दिवशी अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ मुक्कामास राहिले आणि नंतर अक्कलकोट हीच त्यांची कर्मभूमी बनली.

    हिंदू धर्मात शेकडो संत, महात्मे, चमत्कारी साधू होऊन गेले. या सर्व विभूतींनी भारतातीलच काय पण विदेशातील भक्तांना देखील मोहिनी घातली. अशा महान विभूतींपैकीच श्री स्वामी समर्थ हे एक अवतारी पुरुष ! आजदेखील कोणत्याही संकटात एखाद्या स्वामीभक्ताने आर्ततेने स्वामी माउलींना साद घालताच स्वामी त्यांच्या कार्यास धावून जातात हा अनुभव आहे.

    श्री अक्क्कलकोट स्वामी समर्थाना श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाते. श्री दत्तात्रेय-श्रीपाद श्रीवल्लभ- श्री नरसिंह सरस्वती-श्री अक्कलकोट स्वामी महाराज अशी ही अवतार परंपरा आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाबाबत छेली ग्रामची एक कथा सांगितली जाते. शके १०७१ मध्ये पंजाब प्रांत, हस्तिनापूर पासून अंदाजे २४ कि. मी. असलेल्या छेली या ग्रामी धरणी दुभंगून एका सात वर्षीय बालकाचे अवतरण झाले,तेच हे स्वामी समर्थ. परंतु छेली गावापासून ते अक्कलकोट पर्यंतचा त्यांचा प्रवास तसेच चरित्र याविषयी खात्रीलायक आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध नसल्याने या संदर्भात अनेक मतमतांतरे आहेत. श्री स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाबाबत दुसरी एक कथा प्रसिद्ध आहे.ती अशी की गाणगापूर येथील श्री नरसिंह सरस्वती कर्दळीवनात (आंध्र प्रदेश, श्रीशैल्य )तपश्चर्येसाठी निघून गेले. तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्षे कठोर तपश्चर्या केली. बाह्य जगाचे भान न न उरल्याने त्यांच्या अंगाभोवती मुंग्यांनी वारूळ केले. एके दिवशी या वनात उद्धव नावाचा एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी आला असता त्याच्या हातातील कुर्हाड निसटून वारुळावर पडली आणि वारुळातून रक्ताची धार उडाली. हे पाहून उद्धव घाबरला.परंतु क्षणातच एवं दिव्य तेज सर्वत्र फाकले आणि त्या तेजातून एक आजानुबाहू मूर्ती प्रकट झाली, ती म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ स्वतःचे नाव सांगताना नृसिंहभान असे सांगत. कर्दळीवनातून कलकत्ता ,काशी ,प्रयाग अशी भ्रमंती करीत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. श्रीक्षेत्र त्र्यम्बकेश्वर येथे स्वामी समर्थानी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा याना दीक्षा दिल्याचे सांगितले जाते.

    त्यानंतर पंढरपूर, मोहोळ ,सोलापूर ,मंगळवेढे अशी भ्रमंती करत नंतर ते अक्कलकोट मुक्कामी दाखल झाले. कोणत्याही भक्ताने आर्ततेने साद घालताच धाऊन जाणाऱ्या स्वामींनी आपल्या भक्तांना इच्छित देवतांच्या निरनिराळ्या स्वरूपात दर्शन दिल्याचे अनेक दाखले आहेत. भगवान श्रीकृष्णस्वरूप, भगवती स्वरूप ,अन्नपूर्णा स्वरूप ही रूपे अगदी सर्वश्रुत आहेत. स्वामी समर्थ बोलताना हिंदी भाषेचा भरपूर वापर करीत असत. भक्तांच्या कल्याणाची तळमळ असणारे स्वामी निर्भीड आणि स्पष्टवक्ते होते. प्रसंगवशात रौद्र रूप धारण करावे लागले तरी अंतिमतः ते त्यात भक्तांचे हितच जपत होते. निस्सीम श्रद्धेने हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेस प्रतिसाद देणारे ते तारणहार होते. भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे ते कल्पद्रुम होते.

    अहमदनगर येथील गुजर गल्लीमध्ये रेखी यांचा ‘स्वामी समर्थ मठ’ आहे. या मठामधील एका खांबातून स्वामी समर्थानी नाथवेशात दर्शन दिल्याचे सांगतात.या मठाचे संस्थापक श्री. नानामहाराज रेखी हे पिंगळा ज्योतिषी होते. श्री स्वामी समर्थानी त्यांना आपली पत्रिका मांडण्यास सांगितली.. आणि नानामहाराजांनी पत्रिका मांडताच खुश होऊन ‘देखता क्या है, नौबत बजाओ ‘ असे म्हणून त्याच्या हातावर टाळी दिली. तसे नानामहाराजांच्या हातावर निळे विष्णुपद उमटले.हे विष्णुपद आजन्म त्यांच्या हातावर होते. आजही आपण या मठात तो खांब आणि नाना महाराजांनी मांडलेली स्वामींची पत्रिका पाहू शकतो.

    संसारामधील अनेक व्याप- तापानी गांजलेल्या संकटांनी त्रासून गेलेल्या भक्तांना स्वामी ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ‘ असे म्हणून आश्वस्त करत.
‘जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो,मी त्याचा योगक्षेम वहातो .’
‘भिऊ नकॊस पुढे जा, संकट दूर होईल .प्रत्यक्ष काळ आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा सामना करू.’
‘आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा ,राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल.’

ही आणि अशासारखी त्यांची अनेक वचने सर्वसामान्य माणसाला एक अनामिक ऊर्जा पुरवतात,कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य देतात. निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना , हा स्वामींचा तारकमंत्र कोणत्याही कठीण परिस्थितिवर मात करण्याची शक्ती देतो. आज सर्वत्र पसरलेल्या करोनाच्या महाभयंकर साथीवर नक्कीच उपकारक ठरेल.फक्त श्रद्धा ठेऊन मनापासूनआर्ततेने साद घाला.

    जेव्हा काही परकीय देशांमध्ये संत ही पदवी प्राप्त करण्यासाठी एखादा तरी चमत्कार करून दाखविण्याची अट घातली जाते, त्याचवेळी भारतभूममध्ये मात्र पावलापावलावर चमत्कार घडवून आणून आपल्या भक्तांचे मंगल करणाऱ्या अनेक विभूती आढळतात. गरज आहे ती आपण अनन्य भावाने त्यांची भक्ती करण्याची ,त्यांना शरण जाण्याची !

    श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरण गेल्यास या ब्रह्मांडनायक लोकाधिराजाची कृपादृष्टी आपल्यावर कायमच कृपेची बरसात करीत राहील. आणि कोणत्या न कोणत्या स्वरूपात स्वामी आपल्याला दर्शन देऊन सांगतील ‘मै गया नाही, जिंदा हूं !

    श्री स्वामी समर्थ ।।

    पुढील लेखात पाहूया श्री स्वामी समर्थानी केलेले काही चमत्कार ….

One thought on “श्री अक्कलकोट स्वामी प्रकटदिन

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira