गोष्ट श्रियाळ राजाची

   श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस. श्रियाळ षष्ठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतामध्ये श्रियाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रियाळ राजा, त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते. अतिथीला देव मानणे, आपण कोणालाही दिलेला शब्द प्राणापलीकडे जाऊन राखणे याचेअनेक दाखले भारतीय संस्कृतीत वारंवार दिसून येतात. शंकराचा निस्सीम भक्त असणारा हा राजा दातृत्व तसेच वचनाचा पक्का यासाठी प्रसिद्ध होता. दारी आलेल्या याचकाला जे मागेल ते अन्न खाऊ घालून तृप्त करणे, अतिथींचे आदरातिथ्य करणे आणि शंकराची उपासना करणे अशी तो त्याच्या जीवनाची इतिकर्तव्ये मानत होता. चांगुणा राणी गृहस्थधर्म उत्तम निभावत होती.

   एकदा शंकरांनी आपल्या या भक्ताची कठोर परीक्षा घेण्याचे ठरविले आणि ते अतिथीचे रूप घेऊन ते श्रियाळ राजाच्या दारात उभे ठाकले. चांगुणा राणीने त्यांची पूजा केली, आदरातिथ्य केले आणि भोजनासाठी काय करू म्हणून विचारले. तात्काळ त्या अतिथीने नरमांसाची मागणी केली. शुद्ध शाकाहाराचे व्रत कायम पाळणारे राजा राणी या मागणीने एकदम हादरले. तरी पण आपला धर्म सोडायचा नाही म्हणून काय आणि कशी तजवीज करवी याचा विचार करू लागले. तेवढ्यात त्यांच्या कानावर जशी तप्त शिसे ओतावे असे शब्द पडले. हे नरमांस मला तुमच्या स्वतःच्या मुलाचे म्हणजे चिलियाचे हवे आहे, दुसऱ्या कोणाचे नरमांस मी ग्रहण करणार नाही. राजा राणीवर जशी वीज कोसळली. अतिथी असला म्हणून त्याने काय आमच्या लाडक्या चिलिया बाळाच्या जीवावर उठावे, असा विचार राजा करू लागला आणि राणी तर दुःखात पार बुडून गेली. राजाला सांगितले दुसरे कोणतेही नरमांस मला उपलब्ध करून द्या, मी रांधून अतिथीला तृप्त करते. 

   परंतु श्रियाळ राजा वचनाचा पक्का होता. त्याने राणीची समजूत घातली आणि चिलिया बाळाचेच नरमांस रांधून अतिथीला तृप्त करण्यास सांगितले. बिचाऱ्या राणीने मन घट्ट केले आणि आपल्या चिलया बाळाला उखळात घालून कांडू लागली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. तोंडाने माझा चिलिया, माझा चिलिया असा विलाप चालू आहे अशा स्थितीत ती कांडण करीत होती. इतक्यात आपल्या चिलियाचा निरागस चेहरा तिला दिसला .निदान त्याचे तोंड तरी आपल्याला नेहमी दिसेल असा विचार करून तिने तो डोक्याचा भाग बाजूला काढून ठेवला आणि राहिलेल्या धड शिजवून अतिथीला वाढले. 

    मी ह्या भोजनानाचा धिक्कार करतो, यजमानाने स्वार्थाने काही भाग काढून ठेवलेले अन्न मी स्वीकारणार नाही असे म्हणून अतिथी निघून जाऊ लागला. आता मात्र खरी परीक्षा होती.लाडक्या चिलिया बाळाचा जीव तर गेला होताच. पण ममतेपोटी काढून ठेवलेले डोके देखील आता ठेवता येणार नाही. आजपर्यंत आपण गीकारलेल्या व्रताला बट्टा लागणार, आपण आजपर्यत कमावलेले पुण्य सगळे वाया जाणार. सर्व गेले आहेच निदान आता अतिथीचा कोप आणि शाप तरी नको म्हणून शोकग्रस्त राणीने शेवटी लाडक्या चिलियाचे डोके देखील रांधले आणि अतिथींच्या पानात वाढण्यासाठी घेऊन गेली. राजा आणि राणी दोघांनीही अतिथीची क्षमा मागितली. आमच्याकडून प्रमाद झाला तरी आपण क्रोधाविष्ट होऊ नये असे विनविले आणि भोजन सुरु करण्याची विनंती केली. अतिथीला नमस्कार करून त्याची क्षमा मागण्यासाठी ते त्याच्या समोर डोळे मिटून आणि गुडघे टेकून बसले. 

   तेवढ्यात त्यांना आपल्या डोक्यावर हस्तस्पर्श जाणवला. “उठा वत्सानो, तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे, तुम्ही मी घेतलेल्या परीक्षेत खरे उतरले आहात. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ते मागून घ्या”. श्रियाळ राजा आणि चांगुणा राणीने हळूच डोळे उघडले.समोर त्याचे आराध्य दैवत शिवशंकर त्यांना आशीर्वाद देत होते आणि वर पण मागा असे सांगत होते. राणी दुःखाच्या तीव्र अतिरेकाने म्हणाली, “देवा आमचा चिलिया बाळ तर तू आमच्यापासून हिरावून घेतलास,आता आम्ही जागून काय करू. वांझ म्हणून माझ्या बाळाच्या आठवणीत जीवन कंठण्यापेक्षा आता आमच्या शीराचे देखील तुला बलिदान केलेले चांगले.” त्यावर शंकर हसून म्हणाले, “राणी ,तुमचा बाळ कुठेही गेला नाहीये, बघ त्याला हाक मार.” राणीने व्याकुळ होऊन हाक मारली, “अरे माझ्या चिलिया बाळा, कुठे आहेस रे तू मला दिसत सुद्धा नाहीयेस” म्हणून ती रडू लागली आणि काय आश्चर्य! अंगणामधून तिचा चिलिया बाळ धावत धावत आला. 

   श्रियाळ राजाने आणि चांगुणा राणीने आपले ब्रीद सोडले नाही, अगदी त्यासाठी त्यांनी आपल्या बाळाचा बळी देखील दिला. त्याची परमेश्वरावरील निष्ठा,अढळ विश्वास ,आणि दातृत्व यांची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते. एकदम हृदयद्रावक असणारी ही चिलिया बाळाची कथा वाचून आपले मन हेलावून जाते. आणि इतक्या थोर विभूती आपल्या इतिहासात होऊन गेल्या याचा सार्थ अभिमान वाटतो.

Theme: Overlay by Kaira