सिद्धीदात्री

   नवदुर्गांमधील दुर्गेचे हे नववे रूप! साधकाची उपासना योग्य दिशेने चालली आहे याची प्रचिती ही देवी देते.

सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।

भूयात सिद्धीदा सिद्धीदायिनी ।।

या श्लोकाने या देवीची उपासना केली जाते.

   अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व या सिद्धी सिद्धिदात्री देवी प्रदान करते. देवी पुराणानुसार शिवशंकरांनी देखील सिद्धिदात्रीची उपासना केली होती. सिद्धिदात्री मातेच्या आत्यंतिक उपासनेमुळे त्यांचे अर्धे शरीर शक्तिमान होऊन शंकरांचे अर्धनारीनटेश्वर रूप तयार झाले असे मानले जाते.

   सिद्धिदात्री देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. हिचे आसन कमळ असून वाहन सिंह आहे. हातांमध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. दुर्गासप्तशतीच्या नवव्या अध्यायात सिद्धीदात्रीच्या पूजनाची माहिती दिली आहे. त्यानुसार नवरात्राच्या शेवटच्या दिवशी देवीची नऊ प्रकारची फुले, फळे, नवरसयुक्त नैवेद्य दाखवून पूजा करावी. साखरफुटाणे, फुटाणे, खीर यांचा नैवेद्य दाखवावा. श्रीफळ अर्पण करावे.

   देवीच्या पूजनाने यश, धनप्राप्ती होते. देवी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना सिद्धीस नेते. नवरात्राची सांगता सिद्धीदात्री देवीच्या पूजनाने होते. या दिवशी नऊ कुमारिकांचे पूजन मिष्टांन्न भोजन, विडा-वस्त्र देऊन मानपान केला जातो. ही देवी केतूग्रहा वर नियंत्रण करते. हिच्या उपासनेमुळे केतू ग्रहाचा वाईट प्रभाव कमी होतो असे म्हणले जाते.

   साधकांना साधना मार्गावर देवीच्या कृपेने सिद्धी प्राप्त होतात. परंतु त्याचा गैरवापर अथवा अति वापर केल्यास त्या नाश देखील पावतात. त्यामुळे साधकाला सिद्धी प्राप्तीनंतर त्या वापरण्यासाठी महाविद्या, महाज्ञान असण्याची गरज असते. हे महाविद्या, महाज्ञान सिद्धदात्री देवी प्रदान करते. देवीच्या कृपेने साधकाची दुःख पचविण्याची क्षमता वाढते. अन्य आठ दुर्गांसह नवव्या दिवशी सिद्धिदात्रीला शरण गेल्यास संसार तापातून मुक्ती मिळून मोक्षाची द्वारे खुली होतात.

   मन:शांतीच्या शोधात सर्वत्र फिरत राहण्यापेक्षा मनोभावे आईला साद घालावी, ती आपले बालकाप्रमाणे रक्षण करते.

   देवीचा वरदहस्त सर्व भक्तांवर कायम राहो, हाती घेतलेल्या कामात सर्वत्र सिद्धी प्राप्त होवो हीच सिद्धीदात्री आणि समस्त नवदुर्गा यांच्या चरणी प्रार्थना!

    चला तर नवसिद्धी प्राप्त करण्यासाठी देवीची उपासना करू या –

कन्चनाभा शङ्खचक्रगदापद्मधरा मुकुटोज्ज्वला |

स्मेरमुखी शिवपत्नी माता सिद्धी नमोस्तुते ||

Theme: Overlay by Kaira