स्कंदमाता

   नवदुर्गांमधील दुर्गेचे ‘स्कंदमाता’ हे पाचवे स्वरूप! पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ‘पार्वती’, महादेवाची पत्नी म्हणून ‘माहेश्वरी’, शुभ्र वर्ण असणारी म्हणून ‘गौरी’ ही सर्व स्कंदमातेची नावे! कमळाच्या आसनावर विराजमान असणारी म्हणून पद्मासना असेदेखील म्हणतात. तसेच ‘विद्यावाहिनी’ हे पण तिचेच नाव आहे.

   स्कंदमाता या अवताराची उत्पत्ती सांगताना एक कथा सांगितली जाते. एकदा कार्तिकेयाला (स्कंदाला_ इंद्र खूप चिडवू लागलं की तू शिवपार्वतीचा पुत्र नाहीच असे! बिचारा कार्तिकेय व्यथित झाला, दुःखी झाला. बाळ दुःखी असल्याचे कोणत्या मातेला आवडेल बरे! पार्वतीमाता सिंहावर विराजमान होऊन तत्काळ प्रगट झाली आणि स्कंदाला उचलून कुशीत घेतले. स्कंदाची माता ती स्कंदमाता. सृष्टी मध्ये प्रथम प्रसूत होणारी स्त्री स्कंदमाता मानली जाते. 

   या स्कंदमातेचे स्वरूप चतुर्भुज आहे. ती सिंहावर विराजमान आहे. एका हाताने स्कंदाला सावरलेले असून एक हात वर मुद्रेत आहे. दोन हातांमध्ये कमळ आहे. नवरात्रामधील पंचमीला ‘ललिता पंचमी’ असे म्हणले जाते.

सिंहासनगता नित्य पद्माश्रित करद्वया |

शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ।।

या मंत्राने कंद मातेची उपासना केली जाते. या देवीची उपासना केल्याने मन विशुद्ध चक्रात स्थिर होते. साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. साधकाचे मन सर्व बंधनातून मुक्त होते. भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो. मृत्युलोकातच परमशांती, सुखाचा अनुभव प्राप्त होतो. स्कंदमाता सूर्य मंडळाची अधिष्ठात्री असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते.  

   बाल कार्तिकेयासह सिंहारूढ असणारी स्कंदमाता पुत्रवती मातेचे मूर्तिमंत रूप आहे. या तिच्या रूपात शौर्य आणि करुणा यांचा संगम झालेला दिसतो. सिंह शौर्याचे प्रतीक असून देवी रूप करुणामय आहे. प्रेम, वात्सल्य तिच्या डोळ्यातून पाझरत आहे. 

   स्कंदचा खरा अर्थ तज्ञ, निष्णात असा आहे. मातेच्या कुशीतील हा स्कंद निष्णात असला तरी निरागस सुद्धा आहे.  स्कंदमातेची उपासना करीत असताना अनायसेच स्कंदाची देखील उपासना घडते.  भारतामध्ये स्कंदमातेची हिमाचल प्रदेशात खखनाल येथे गुंफा मंदिर, वाराणसी येथे वागीश्वरी मंदिर, दिल्ली येथे पटपडगंज येथे मंदिर अशी काही मंदिरे आहेत. त्यापैकी दिल्ली येथील पटपडगंज मंदिर सर्वात प्राचीन आहे. वाराणसी येथील वागीश्वरी मंदिरात लोक पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात.  

   स्कंदमातेच्या पूजादिनी पाच वर्षांच्या पाच कुमारिकांची पूजा करून त्यांना खीर मिठाई युक्त भोजन दिले जाते.  भोजनोत्तर या कुमारीकांचा लाल वस्त्र देऊन सत्कार केला जातो. 

   स्कंदमातेला केळी तसेच केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. सहा विलायची स्कंदमातेस वाहून त्यांचे सेवन केले असता बुद्धीवर्धन होते असे मानले जाते. चला तर मग या वाचल रूप मातेचे गुणगान गाऊ या –

नमामि स्कंदमाता स्कंदधारिणीम् ।

समग्र तत्त्व सागरमपारपार गहराम् ।।

Theme: Overlay by Kaira