सुभाषित – १

    ‘देववाणी संस्कृत – ओळख’ या लेखातून आपण संस्कृत भाषेची थोडक्यात ओळख करून घेतली. श्लोकमय सुभाषित हे संस्कृत भाषेचे खास वैशिष्ट्य असून हा प्रकार फक्त संस्कृतमध्येच दिसून येतो. सुभाषितांमध्ये बऱ्याच वर्षांचे शहाणपण आणि अनुभव यांचा संगम झालेला आढळतो. सुभाषिते हा केवळ अभ्यास करण्याचा विषय नसून यातील शहाणपणाचा जीवनात वापर करून जीवन अर्थपूर्ण बनवण्याचे सामर्थ्य सुभाषितांत आहे.

    सुभाषितांमुळे माणसाचे चारित्र्य घडते, त्याला माणूसपण प्राप्त होते, जगात कसे वागावे याचे ज्ञान मिळते. पॅरिसमधील सॉरॉबॉन विद्यापीठामधील संस्कृतचे प्राध्यापक ‘लुडविक बाख’ केवळ संस्कृतप्रेमापोटी युरोप सोडून हिमालयाच्या पायथ्याशी येऊन राहिले. सुभाषितांचे सहा प्रचंड खंड प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी भारतातच देह ठेवला.

    मनातील भावना कमीत कमी पण अचूक शब्दांत व्यक्त करण्याचे सामर्थ्य सुभाषितांमध्ये आहे. त्यामुळे संस्कृत साहित्यात सुभाषितांचा वापर विपुल प्रमाणात केलेला आढळतो.

    या सुभाषितांबद्दलच असणारे एक सुभाषित :

पृथिव्यां त्रीणि रत्नानि ।

जलम् अन्नम् सुभाषितम् ।।

मूढै: पाषाण खंडेषु |

रत्नसंज्ञा विधीयते ||

अर्थ :

पृथ्वीवर जल, अन्न आणि सुभाषिते अशी तीन रत्ने आहेत. (परंतु) मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला(च) रत्न असे नाव देतात.

संस्कृतमधील अजून सुभाषिते वाचण्यासाठी ‘देववाणी संस्कृत’ या विभागाला नक्की भेट द्या.

Theme: Overlay by Kaira