सुभाषित – भाग ३

निसर्गाकडून दानाचा गुण नक्कीच शिकावा. निसर्गातील प्रत्येक घटक दानाचे महत्त्व सांगतो. पशू, पक्षी, डोंगर, नद्या, वृक्ष सर्व जण मानवजातीला भरभरून दान देतात. गौतम बुद्धांनी देखील एका छोट्या मुलीकडून अगदी अंगणातील चिमूटभर माती दान म्हणून स्वीकारल्याची कथा सर्वश्रुत आहे. दान म्हणून काय दिले यापेक्षा दान देण्याची वृत्ती असणे हे मानवतेचे लक्षण आहे. अक्षय्यतृतीयेला दानाचा एक वेगळा पण महत्त्वाचा संदर्भ आहे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात तापलेल्या जीवाला शांती वाटेल असे थंड पाण्याचे दान केले जाते तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री, जोडी अशा गोष्टींचे दान केले जाते. दानाचे महत्त्व सांगणारी दोन सुभाषिते :

“गौरवं प्राप्यते दानात्, न तु वित्तस्य संचयात् ।

स्थितीरुचै: पयोदान, पयोधि नामध: स्थिती ।।”

अर्थ :

दानामुळे मनुष्यास श्रेष्ठत्व प्राप्त होते. संचयामुळे नाही. पाणी देणारे ढग आकाशात उंचावर विराजमान असतात (तर) पाणी साठवून ठेवणाऱ्या समुद्राचे स्थान खाली जमिनीवर असते. दान देणाऱ्या ढगातील पाणी मधुर असून तहान भागवते (परंतु) संचय करणाऱ्या समुद्रातील पाणी कोणीही प्राशन करू शकत नाही. 

“दानेन श्लाघ्यतां यान्ति पशुपाषाणपादपा: ।

दानमेव गुण श्लाघ्य: किमन्यैः गुणराशीभि : ।।”

अर्थात, दान केल्यामुळेच पशू, पाषाण, वृक्ष प्रशंसेस प्राप्त ठरतात. दान करण्याचा गुण इतका प्रशंसनीय आहे की इतर गुणांची काय आवश्यकता?

Theme: Overlay by Kaira