भारत भूमी महान विभूतींची , संत महात्म्यांचे भूमी आहे. अखंड भारत भूमीच्या क्षेत्रामध्ये निरनिराळे साधू अवलिया अनेक चमत्कार करताना दिसतात .अक्कलकोटचे’ श्री स्वामी समर्थ ‘हे साक्षात दत्तप्रभूंचे अवतार! त्यांचा प्रकट काल हा भारत पारतंत्र्यात असल्याचा काळ होता. आधी मोगलाई नंतर इंग्रज ,भारतीय जनसामान्य लोक दहशतीखाली वावरत होते . मनातील भीती शरीराला देखील दुबळे बनवत होते .अशातच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाले . स्वतःची ओळख’ मूळ ,पुरुष मूळ, वडाचे झाड, दत्तनगर’ अशी करून देत नास्तिकांना चमत्कारा द्वारे ईश्वरी शक्तीची ओळख घडवून आणली आणि दुःखामध्ये ही आशेची हिरवळ निर्माण केली. सामान्य जनतेमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग जागविले त्यांच्या मनामध्ये आत्मसन्मान निर्माण केला.
स्वामींच्या चरित्रामध्ये अद्भुत आणि प्रेम या रसांचे विलक्षण मिश्रण आढळते. कधीतरी रौद्ररसाचे देखील दर्शन घडते . स्वामींनी घडवून आणलेल्या अघटित लीलांचे श्री . गोपाळबुवा केसकर यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. स्वामींचे नित्य चमत्कार ‘अक्कलकोट स्वामी समर्थ बखर’ या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवलेले आढळतात. ब्रम्हांडनायक राजाधिराज अक्कलकोट स्वामी महाराजांची सर्व दैवत देवता पूजन करत असत. आणि त्यांचे ठायी नित्य वस्ती करून असतात. दुसऱ्यांच्या मनातील प्रश्न ओळखून त्यांची उत्तरे देण्याचा खेळ स्वामी नेहमीच करीत असत . चैतन्याला स्थूल देहाचे कोणतेच नियम लागू पडत नाहीत. चैतन्यमय स्वामी अतिसूक्ष्म तसेच अति विराट रूप केव्हाही धारण करू शकत असत .याच मुळे आपल्या निरनिराळ्या भक्तांना निरनिराळ्या स्वरूपात त्यांच्या इच्छित देवतेचे स्वरूपात दर्शन दिल्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांमध्ये हिंदू ,मुस्लिम ,ख्रिश्चन ,पारशी इत्यादी सर्व धर्मीय लोक होते. द्द्द्वारकेमध्ये महान कृष्णभक्त सूरदास होते. ते जन्मांध असले तरी श्रीकृष्णाचे सगुण-साकार दर्शन घडावे ही त्यांची मनोमन इच्छा होती. स्वामी समर्थ त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले,” तू ज्याला आळवतो आहेस तो मी तुझ्या दारात उभा आहे बघ तर खरं !”असं म्हणून त्यानी त्याच्या नेत्रावरून हात फिरवले तेव्हा सूरदासास दिव्यदृष्टी प्राप्त होऊन शंख, चक्र, गदाधारी श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन घडले.
मंगळवेढ्यातील बसप्पाचा दारिद्र्यनाश तसेच सर्पाच्या बदल्यातील सोन्याच्या लगडी हे चमत्कार सर्वश्रुत आहेत . बाप्पाजींच्या कोरड्या विहिरीत पाणी आणण्याची किमया स्वामींचीच !
‘ आज्ञेविन काळही ना नेई त्याला ‘ ही उक्ती खरी करून दाखवणारा चमत्कार अक्कलकोट संस्थानचे मानकरी श्री. तात्याजी भोसले यांच्या बाबतीत श्री स्वामींनी करून दाखवला. श्री. तात्याजी भोसले हे स्वामींचे भक्त, स्वामींची नित्य सेवा करण्यासाठी दररोज स्वामींकडे येत. एके दिवशी ते स्वामी सेवेत मग्न असताना अचानक स्वामी म्हणाले’ तुला बोलावणे आले ‘तात्याजी समजून चुकले. त्यांनी स्वामीना विनंती केली की, मला अजून तुमची सेवा करायची आहे. तेव्हा स्वामींनी आज्ञा केली की, हा माझा भक्त आहे याला स्पर्श देखील करू नको . तिकडे बैल बसला आहे त्याला घेऊन जा ‘ असे सांगताच तात्काळ तो बैल मृत्युमुखी पडला व तात्याजींचे प्राण वाचले. स्वामींच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष काळ देखील तात्याजीना नेऊ शकला नाही .
श्री स्वामी महाराज आपल्या भक्तांची माऊली प्रमाणे काळजी वाहत असत .आपल्या भक्तावर संकट आलेले ते कोठूनही जाणत असत. मोरोबा कुलकर्णी हे असेच स्वामींचे अनन्य भक्त . त्यांच्याच अंगणात स्वामी रात्री अन्य भक्तांचा समवेत निजत असत. मोरोबांच्या पत्नीला खूप जुनी पोटशूळाची व्याधी होती .अचानकच कधीतरी भयानक असा पोटशूळ उठून त्या अक्षरश: जमिनीवर गडबडा लोळत . असेच एकदा स्वामीं आपल्या भक्तांसमवेत अंगणात झोपले असताना मोरोबांच्या पत्नीचा पोटशूळ उद्भवला. नेहमी नेहमीच्या या त्रासाला कंटाळून ,वेदनांनी व्याकुळ होऊन त्यांनी शेवटी आपली जीवनयात्रा संपवण्याचा इराद्याने विहिरीकडे धाव घेतली . आणि अचानक स्वामींनी आपल्या शेजारील भक्तास उठवून तातडीने विहिरीकडे धाडले . भक्त तिकडे जाताच त्याच्या नजरेसमोर मोरोबांची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या बेतात दिसली. त्यांनी तिला स्वामीं समोर आणून उभे केले . तिने स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली .स्वामींची कृपादृष्टी तिच्यावर पडताच तिची व्याधी कायमची नाहीशी झाली .
‘जो माझी भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी वाहतो‘ स्वामी नुसते वचने सांगत नाही तर तंतोतंत आचरणात आणतात. चैतन्यरूप स्वामींची चराचरावर सत्ता चालते . अक्कलकोट गावातील महिपाल देवालयाच्या रस्त्यावर मालोजी राजांच्या’ गव्हार’ नावाच्या हत्तीला बांधून ठेवण्याची जागा होती. एकदा हा’ गव्हार ‘अत्यंत पिसाळला. चारी पाय साखळदंडाने बांधून ठेवले तरी सोंडेने मोठमोठे दगड भिरकावू लागला . त्या रस्त्यावर कोणालाही जाणे मुश्कील झाले. मालोजीराजे स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामींना साकडे घातले. स्वामींनी ऐकून घेतले आणि ते एकटेच रस्त्याकडे निघाले . मालोजी राजांनी त्यांना एकटे जाण्याबद्दल परोपरीने विनवले, परंतु स्वामी एकटेच जाऊन हत्तीसमोर उभे ठाकले आणि कमरेवर हात ठेवून म्हणाले “ मुर्खा,माजलास का? चढेल तो पडेल, बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे !’ ही स्वामींची आज्ञा ऐकताच तो पर्वतप्राय उन्मत्त प्राणी एकदम शांत झाला. पुढच्या पायांचे गुडघे जमिनीवर ठेवून गंडस्थळ टेकून स्वामींना दंडवत घातला. आणि त्याच्या नेत्रातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्यानंतर तो कधीच पिसाळला नाही.
स्वामीना भगवती स्वरूपात पाहिलेले अनेक भक्त आहेत , परंतु भक्तांसाठी स्वामी अन्नपूर्णा देखील झाले . कोनाळी गावाच्या रानातून एकदा स्वामी चालले होते . सोबत श्रीपाद भट आणि सुमारे शंभर सेवेकरी होते. सर्वजण चालून चालून थकले होते आणि प्रचंड भुकेले होते. चालता चालता स्वामी एका शेतात विसावले . स्वामी शेतात विसावल्याचे , पाहताच त्या शेताच्या मालकाने आनंदून स्वामींना पाणी फलाहार दिला परंतु त्यांच्या भक्तांचे काय ?श्रीपादभटांची स्वामींवर नितांत श्रद्धा होती. स्वामी माऊली लेकरांना भुके ठेवणार नाही अशी त्यांना एकदम खात्री होती आणि त्यांचा दृढ विश्वास खरंच ठरला . अचानक एक वृद्ध, हसतमुख सुवासिनी त्यांना समोर आली आणि तिने विनंती केली की आज माझ्याकडे काही पाहुणे येणार होते म्हणून मी त्यांच्यासाठी भरपूर स्वयंपाक बनवला आहे आता सूर्यास्त होत आला तरी अजून आले नाहीत कृपया मी देते तो सर्व स्वयंपाक आपण स्वीकारून यथेच्छ भोजन करावे . अशा वेळी त्या वृद्धेच्या स्वरूपातअन्नपूर्णाच त्यांना पावली आणि या सर्वांचे का कर्ते करविते होते ‘ ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ’.
या आणि अशा सारख्या अनेक लीला ,चमत्कार कथा श्री. वामनबुवा वैद्य यांनी,’ गुरुलीलामृत’ या ग्रंथात शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत.
श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामींना शरण गेल्यावर अनुभवाला येते प्रचिती. सर्वशक्तिमान आणि नित्य जागृत असणारे स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी( स्मरण करताच धावून येणारे) म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वामींच्या लीला अतर्क्य आणि अगणित आहेत. सूर्याचे किरण मोजता येऊ नयेत , सागरातील लाटा मोजता येऊ नये अगदी त्याचप्रमाणे स्वामींच्या लीला देखील अनंत आहेत . आपण तरी या लीला मोजायच्या करंटेपणा कशासाठी करायचा ?
नितांत श्रद्धेने स्वामीचरणांवर मस्तक ठेवावे आणि त्यांच्या कृपेचे अमृत अनुभवावे.
।। श्री स्वामी समर्थ।।
Original content here is published under these license terms: | X | |
License Type: | Read Only | |
License Abstract: | You may read the original content in the context in which it is published (at this web address). No other copying or use is permitted without written agreement from the author. |
स्वामी ओम खूप सुंदर माहिती समजली स्वामींची बखर आहे हे मला आता स्वामींच्या सिरीयल मध्ये कळले होते आता परत वाचनात आले स्वामी ही आपल्या अंतर मनाची शक्ती आहे ती अनुभवली तरच कळते
जय-जय स्वामीसमर्थ !