श्री अक्कलकोट स्वामींच्या हातातील गोटीचे रहस्य

    पद्मासनात बसलेली स्वामींची आजानुबाहु मूर्ती, चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव, नजरेमध्ये मार्दव भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे नेत्र! लंबोदर,खांदे भरदार परंतु डावा खांदा कायम वरच्या रेषेत कारण तो हात आधारासाठीजमिनीवर टेकविलेला पण उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी मध्ये धरलेली काचेची गोटी.स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो.

   एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर स्थिरावते ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि आंगठयामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर. यालाच’इंद्रनील मणी’म्हणतात. का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी? त्याचे प्रयोजन काय? त्यामागील पार्श्वभूमी काय?

   खरे तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रकट कथेशी. श्री स्वामी कर्दळीवनातून प्रकट झाल्याची कथा सांगतात.तसेच दुसरी एक कथा हस्तिनापूर जवळील छेले या ग्रामी स्वामी प्रकट झाल्याची देखील एक कथा आहे. छेले ग्रामी श्री स्वामी प्रकट प्रकट होण्याची लीला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे (श्री स्वामीसुत महाराज) लिखित ‘श्री स्वामी समर्थ जन्मकाण्ड’ या प्रकरणात आढळते.

‘विजयसिंगे ही गोटी । वटवृक्ष छायेसी गोमटी|

भगवंत मानोनीया जगजेठी । मांडोनिया खेळतसे ।

नाव घेऊनिया भगवंताचे । गोटी आहे कौतुक त्याचे ।

एकटाच बोल आपसांत। म्हणे देवबाप्पा खेळी वेगे।

   श्री स्वामींचा परमभक्त विजयसिंग या आठ वर्षाच्या बालभक्ताच्या भक्तीला भुलून श्री स्वामी समर्थ श्री गणेशाच्या साक्षीने प्रकटले अशी कथा सांगितली जाते. विजयसिंग हा बालभक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळात असे. प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आवाहन करीत असे. गम्मत म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहेत असे समजून दोन्ही डाव स्वतःच खेळात असे. आणि याला साक्षी होते याच वटवृक्षाखालील गणपतीबाप्पा. या गणपतीबाप्पाच नाव होते वक्रतुंड. या गणपतीचे छोटेसे मंदिर होते. याच विजयसिंगाबरोबर या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील आहे. हाच हरिसिंग नंतरच्या जन्मात हरिभाऊ म्हणून ओळखला गेला आणि स्वामीसुत या नावे प्रसिद्ध झाला असे सांगितले जाते.

   स्वामी प्रकटीकरणाच्या वेळी हा गोट्याचा डाव रंगात आलेला होता,तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवीत,आपली शुंडा हलवून या खेळाला दाद देत आहेत. खेळाची चरमसीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले, आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटीमधून श्री दत्त बाहेर आले.

विष्णू स्तंभी प्रकटले । दत्त गोटी फोडून आले ।

माझ्या स्वामींची करणी । कंप होतसे धरणी ।

या शब्दांमधून या घटनेचे वर्णन केलेले दिसून येते.

   पुराणककथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला तरी एका महास्फोटामधून विश्वाची निर्मिती झाली हे शास्त्रीय सत्य आहेच. हा संदर्भ झाला स्वामींच्या प्रकट होण्याबाबतचा. याच गोटीबद्दल स्वामींनी श्री मामासाहेब देशपांडे याना स्पष्टीकरण दिल्याचे सर्वसंमत आहे.

   असेच एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवीत होते,मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते. आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानकच मामासाहेब देशपांडे याना म्हणले,”अरे सख्या,तुला खरंच पाहायचे आहे का हे काय आहे ते?“ असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली. तत्क्षणी ती गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसू लागले.जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडविलेले विश्वरूप दर्शनच होते ते. सर्व भक्त मंडळी अचंबित झाली. यापुढे स्वामी असेही म्हणाले कि “आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे, आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असे समज. श्री स्वामी समर्थाना’अनंतकोटी ब्रह्माण्डनायक’ का म्हणतात याचा उलगडा त्या वेळी सर्वाना झाला.

   गोटी या शब्दाचा अर्थ विस्ताराने पहिला तर गो-गोपनीय, टी -टिप्पणी असा आहे.ब्रह्माण्डातील अनंत गुप्त गोष्टी त्यांना या गोटीमध्ये दृगोचर होत असत. स्वामीमहाराज हीच गोटी आपल्या बोटानी फिरवीत ब्रह्माण्डातील घडामोडीवर लक्ष ठेवीत असत. बसल्या जागेवरून त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजत असे.

   आपल्या परमभक्ताना संकटातून तरुन नेण्यासाठी स्वामी अखंड सज्ज असतात. परंतु त्याआधी ते भक्ताची त्यांच्यावरील श्रद्धेची कठोर परीक्षा घेतात. त्यांनी घेतलेल्या कसोटीस खरे उतरणाऱ्या भक्तांना स्वामी माउली कधीच अंतर देत नाहीत. आपल्या भक्तांचा योगक्षेम हे अनंतकोटी ब्रह्माण्डनायक स्वामी बसल्या जागेवरून सांभाळतात. स्वामींच्या अनेक भक्तांना ही प्रचिती आली आहे.

   स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली ही गोटी (इंद्रनील मणी ) आजही बेळगाव येथील सद्गुरू किरणस्वामी यांच्याकडे आपण पाहू शकतो. या गोटीसोबतच तेथे श्री स्वामींच्या चरण पादुका देखील आहेत.

   भाविकांसाठी किरण स्वामींचा पत्ता :-
श्री स्वामी समर्थ मनमंदिर
सद्गुरू किरणस्वामी नायडू
९६२, मेणसे गल्ली,
बेळगांव,कर्नाटक.

Theme: Overlay by Kaira