लोकगायक – वासुदेव

कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावामध्ये भिक्षाफेरी मारतात. अविरत फिरणाऱ्या कालचक्राच्या गतीत ‘रामाच्या पारी’ हा शब्द जणू हरविल्यासारखा झाला आणि गावागावातून ‘दान पावलं, दान पावलं’ असे गात पायात चाळ, हातात मंजिरी, चिपळ्या वाजवित सकाळीच गाव जागे करणारे ‘वासुदेव’ अभावानेच दिसू लागले. मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात आता कालबाह्य होत आहे.