त्रिपुरी पौर्णिमा

   कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ‘कार्तिकी पौर्णिमा’. याच पौर्णिमेला ‘त्रिपुरी पौर्णिमा’(त्रिपुरारी पौर्णिमा) असेही म्हणतात. जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला ‘महाकार्तिकी पौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी शिवमंदिरामध्ये, घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते. मंदिरासमोर असणाऱ्या दगडी दीपमाळा स्वच्छ करून तिथे दिवे लावले जातात. दिव्यांची मोठी आरास घरांमध्ये, घराबाहेर, मंदिरांमध्ये असते म्हणून या कार्तिकी पौर्णिमेस ‘देव दिवाळी‘ असेदेखील म्हटले जाते. खरेतर कार्तिकी शुद्ध एकादशी पासूनच या पवित्र पर्वाची सुरुवात होते. कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. हा तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतरच घरातील विवाह केले जातात.

   कार्तिक एकादशी ‘प्रबोधिनी एकादशी‘ म्हणून ओळखली जाते. या दिवशी चातुर्मास समाप्ती होते आणि शेषशायी विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात. चातुर्मासात जगाची सूत्रे श्रीशंकरांकडे असतात. वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेचा आदला दिवस, या दिवशी रात्री शंकर विष्णूंना भेट देतात आणि त्यांच्याकडे जगाची सूत्रे पुन्हा सोपवून कैलासाकडे तपस्येसाठी निघून जातात असे मानले जाते. यामुळे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हरिहर भेटीचा दिवस मानला जातो. फक्त आणि फक्त याच दिवशी रात्री शंकरांची १००८ नावे घेऊन त्याला तुळशी वाहतात तर विष्णुची १००८ नावे घेऊन त्याला बेल वाहिला जातो. वाराणसी शहरामधील मंदिरात तसेच इतर अनेक मंदिरात देखील हरिहर पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशी नंतर येते कार्तिकी पौर्णिमा. तुलसी विवाहासाठी हा शेवटचा दिवस असतो . कार्तिकी पौर्णिमेस ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असे म्हणण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते.

   तारकासुर वधानंतर त्याचे तीन पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष यांनी तपस्या करून अद्भुत स्थानांचा वर प्राप्त करून घेतला. ही तीन स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखले जातात. या शहरांचे अद्भुत वर्णन सांगताना, ही शहरे आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनंतर ही शहरे एकाच ठिकाणी यावीत, त्याचवेळी माध्यान्ही, अभिजीत मुहुर्तावर, चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना आकाशात पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जो कोणी असंभव स्थानावरून एकाच बाणाने तिन्ही पुरांना लक्ष्य करेल तेव्हाच ती नष्ट होतील अन्यथा ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांना देण्यात आला. इतक्या सर्व गोष्टी एकत्र जुळून येणे अशक्य आहे असे वाटल्याने त्यांचे शत्रू भय नष्ट झाले. ते उन्मत्त झाले. तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकरांनी एकाच बाणात ही तीनही पुरे जाळून नष्ट केली असे सांगितले जाते. या प्रसंगाची आठवण म्हणून त्रिपुर वात जाळण्याचा प्रघात आहे .

   गोव्यामधील विठ्ठलपुरला प्रतिपंढरपूर मानले जाते आणि पंढरपूर येथे चंद्रभागेमध्ये करण्यात येणाऱ्या दीपदाना ची परंपरा येथे पाळली जाते. या साखळी उत्सवास अलिकडे राजकीय मान्यता मिळाली आहे. राजस्थान मधील पुष्कर क्षेत्री ब्रह्मा मंदिर परिसरात त्रिपुरी पौर्णिमेला मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची खरेदी-विक्री होते. पुष्कर सरोवरात दीपदान केले जाते. वाराणसी घाटावर देखील हजारो दिवे गंगेच्या पात्रात दीपदान म्हणून सोडले जातात आणि देव दिवाळी साजरी केली जाते.

   कार्तिकी पौर्णिमेचा दिवस विष्णू भक्तांसाठी खास मानला जातो. विष्णूचा प्रथम अवतार ‘मत्स्य’ यांचा जन्म या दिवशी झाला असे मानले जाते. याच स्वरूपात श्रीविष्णूने शंखासुर या असुराचा वध करून वेदांचे रक्षण केले होते अशी कथा सांगितली जाते. कार्तिकी पौर्णिमेला शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया आणि क्षमा या कृत्तिकांचे पूजन केले जाते. त्रिपुर वात लावणे या व्रताचे त्रिपुरी पौर्णिमेस विशेष महत्त्व आहे. १८ धाग्यांनी बनवलेल्या ७५० वाती तुपामध्ये भिजवून पितळी पात्रात ठेवून त्याने देवाची आरती केले जाते आणि त्या तशाच प्रज्वलित अवस्थेत देवासमोर ठेवल्या जातात यालाच त्रिपुर वात जाळणे असे म्हणतात.

   कार्तिकी पौर्णिमेस क्षीरसागर दान करण्याचीदेखील पद्धत आहे. २४ अंगुळें उंच पात्रात दूध घेऊन त्यामध्ये सुवर्ण. अथवा रजत मत्स्य सोडून त्या पात्राचे दान यामध्ये केले जाते दक्षिण भारतामध्ये कार्तिकी पौर्णिमा ‘कृतिका महोत्सव’ म्हणून जरी साजरा होत असेल तरी उत्तर भारतामध्ये कार्तिकी पौर्णिमा ‘स्कंद जयंती’ म्हणून साजरी करतात. शिवपार्वतीचा मोठा पुत्र, गणपतीचा ज्येष्ठ बंधू तोच स्कंद ! कार्तिकेय, षडानन, मुरुगन अशा अनेक नावांनी ओळखला जातो. हा देवांचा सेनापती मानला जातो . कार्तिक महिना, पोर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तिन्ही गोष्टी एकत्र असताना कार्तिकेयाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. एरवी कार्तिकेयाचे दर्शन स्त्रियांसाठी वर्ज्य मानले जाते परंतु या पर्वकाळात स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्याला दंड, कमंडलू, रुद्राक्षाची माळ, कमळाचे फूल, पांढरी फुले, दर्भ अशा वस्तू अर्पण केल्या जातात.

   कोजागिरी पौर्णिमे नंतर म्हणजेच चंद्राच्या पूर्ण १६ कला विकसित झाल्यानंतर येणारी ही कार्तिक पौर्णिमा प्रतिकात्मक रुपाने असुरांचा नाश करते आणि मानवी जीवनातील दिवाळीचा आनंद द्विगुणीत करते. तुळशी विवाहाच्या रुपाने जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते. आसुरी दुष्ट प्रवृत्तींचा प्रभाव वाढला असता परमेश्वर त्यांचे निर्दालन करतो. त्रिपुरासुराचा नाश करणारे शिवशंकर लवकरच ‘कोरोना’ असुराचा देखील संहार करोत आणि पृथ्वीवर आरोग्य, शांतता नांदो हीच प्रार्थना!!

Theme: Overlay by Kaira