वाघ्या – मुरळी

   खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या मधील एक लोकप्रिय दैवत. या खंडोबाचे पुरुष उपासक म्हणजे वाघ्ये,तर स्त्री उपासक म्हणजे मुरळी. जागरण- गोंधळ हा शब्द जरी सध्या एकत्रित वापरला जात असला तरी गोंधळ हा कुलदेवतेच्या कुलाचाराप्रीत्यर्थ गोंधळी लोक घालतात, तर जागरण हे खंडोबाच्या कुलाचाराचा विधी असतो. घराण्यांची सांस्कृतिक परंपरा या दोन विधीने पुढे नेली जाते.

   वाघ्या- मुरळी हे खंडोबाचे भक्त खंडोबाला नवसाने वाहिलेले असतात. मुलं जगत नसतील तर होणारे पहिले मूल (मुलगा अथवा मुलगी) खंडोबाला वाहीन असा नवस केला जातो आणि नंतर तो पूर्ण केला जातो. वाघ्यांमध्ये घरवाघे आणि दारवाघे असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. नवस पूर्ण करताना आधी दीक्षाविधी होतो.

   घरवाघे जे असतात ते नवस फेडायचा म्हणून काही काळ वाघ्याचा वेश परिधान करून भिक्षा मागतात ,परंतु दारवाघे हे कायमचे दीक्षा घेतलेले खंडोबाचे उपासक असतात. भक्तांच्या घरातील धार्मिक कामे पार पाडणे, भक्तांच्या वतीने जागरण करणे, लंगर तोडणे भिक्षेसाठी वारी मागणे ही सर्व कामे करतात. भिक्षा हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्रातील कुणबी ,धनगर, बलुतेदार तसेच हरिजन समाज वाघ्या- मुरळी म्हणून वावरतांना दिसतात.

   वाघ्याची उत्पत्ती चंपा नगरीच्या राजापासून झाली असे मानले जाते. कन्नडमध्ये ‘वाग्गय’ म्हणजे कुत्रा, देवाचा (खंडोबाचा) निष्ठावान, प्रामाणिक, एकनिष्ठ भक्त असणारा दास तो वाघ्या. वाघ्ये स्वतःला खंडोबाचे कुत्रे समजून भुंकतात, दोन हात टेकून चालतात असे उल्लेख बाराव्या शतकापासून सापडतात.

   

   या वाघ्यांची अजून एक मजेशीर पुराणकथा’ मल्हारी मार्तंड विजय’३७-३८ या अध्यायांमध्ये सापडते. मल्हारी मार्तंडाचा अजामेळ नावाचा धनगर भक्त मेंढी पालन करीत असे. मेंढ्या रानात चरायला सोडल्या की हा अजामेळ शिवनामात दंग होऊन जात असे. एकदा असेच त्याने मेंढ्या चरायला सोडल्या आणि स्वतः शिवनामात दंग होऊन गेला. तेव्हा वाघाने हल्ला करून अनेक मेंढ्या मारल्या. त्याच्या शिवभक्तीने प्रसन्न होऊन मल्हारी मार्तंड याने या मेंढ्या जिवंत केल्या . आपली अनेक कुत्री वाघाच्यामागे सोडली या कुत्र्यांनी वाघाला घेरून देवाजवळ आणले. या शरण आलेल्या वाघाला तू माझे गुणगान करीत राहा आणि कुत्र्याप्रमाणे सेवक होऊन राहा असा आदेश मल्हारी मार्तंड आणि दिला तेव्हापासून मल्हारीचे सेवक वाघ्याच्या स्वरूपात दिसून येतात.

   मुरळी म्हणजेच खंडोबाला नवसाने सोडलेली स्त्री. मुरळीचा विवाह खंडोबाशी लावला जातो आणि मग ती जागरणा मध्ये वाघ्यांच्याबरोबर सामील होते. पदराला बांधलेली घाटी वाजवत खंडोबाची गीते गात ती नृत्य करते. संपूर्ण आयुष्य खंडोबाच्या सेवेसाठी वाहून घेते. दुर्दैवाने ही लोककला जोपासताना त्याला बाजारू स्वरूप आले आहे .

   स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देवाला मुले-मुली सोडण्यावर कायद्याने बंदी आल्यावर मुरळ्या सोडण्याची प्रथा संपुष्टात आली तरीही काही जणी अवैध रीतीने मुरळी बनतात आणि उघड-उघड वेश्याव्यवसाय स्वीकारतात. मुरळी प्रथेवर बंदी असली तरी वाघ्या प्रथेवर मात्र बंदी नाही. पिवळी नऊवारी साडी, हातात काचेच्या बांगड्या, कुंकू आणि भंडारा लावलेल्या मुरळीच्या पदराला घोळ म्हणजे घंटा बांधलेली असते ती वाजवून खंडोबाचे गुणगान करीत जागरणा मध्ये ती वाघ्यांची साथ-संगत करते.

   मुरळीची उत्पत्ती तिलोत्तमा पासून झाली असे मानले जाते. तिलोत्तमा ही इंद्राच्या दरबारातील नर्तिका स्वतःच्या नृत्यकलेचा तिला अत्यंत गर्व झाला आणि तिने देवेंद्राच्या आज्ञेचा अनादर केला तेव्हा देवेंद्रने तिला “ तू भूलोकी जाशील आणि सर्व नृत्यकला विसरशील “असा शाप दिला. तिलोत्तमेने पश्चाताप होऊन उ:शाप मागितल्यानंतर “श्रीविष्णू तुला मुरलीच्या स्वरूपात जवळ करतील तर मल्हारी अवतारात त्याच्यासमोर नृत्य-गायन करून तू त्याची सेवा करशील” असा उ:शाप दिला. तेव्हा कृष्णाची मुरली बनलेली तिलोत्तमा नंतर खंडोबाची सेविका मुरळी बनली. काही विवाहित स्त्रिया देखील नवसाने खंडोबाचा पती म्हणून स्वीकार करत असत आणि मुरळी बनत असत.

   महाराष्ट्रामधील वाघ्यांचा विशिष्ट असा पोषाख दिसून येत नाही परंतु कर्नाटकामधील वाघ्यांच्या गळ्यात व्याघ्रचर्म ची भंडार्‍याची पिशवी, कोटंबा (दोत) म्हणजेच भिक्षापात्र, गांठा (कवड्या गुंफलेली दोरी), दिवटी बुदली, ध्वज, डमरू,त्रिशूळ अशा गोष्टी असतात. अंगावर घोंगडीची कफनी असते. जागरण विधी देखील गोंधळा प्रमाणेच असतो. काही फरक दोन्हींच्या विधिविधान मध्ये असले तरी साम्य बरेच आहे.

   जोंधळ्याच्या तिकाटण्यात खंडोबाची मूर्ती स्थापन करून तिची पंचोपचार पूजा केली जाते आणि नंतर वाघ्या- मुरळी तसंच खंडोबाचे महतीपर गाणी गातात. या अभियानामध्ये तुणतुणे, खंजिरी, दिमडी अशा वाद्यांची साथ केली जाते. ’येळकोट येळकोट जय मल्हार’ या घोषाने हळदीचा भंडारा उधळला जातो. खंडोबा या अद्भुत शक्तीच्या कर्तुत्वाचे, शौर्याचे दर्शन घडवणारी गाणी गायली जातात. आख्यानामध्ये खंडोबाच्या वीर रसात्मक युद्ध कथा सांगितल्या जातात. खंडोबा ही दैवी अद्भुत शक्ती असणारी देवता, परंतु म्हाळसा आणि बानू या दोन्ही पत्नीमधील सवती मत्सराच्या कथांनी ही देवता मनुष्य पातळीवरयेते आणि श्रोत्यांचे मनोरंजन होते.

   मूल जगावे म्हणून देवाला सोडून दिलेल्या वाघ्या -मुरळीचा स्वतंत्र समूह आहे. समाजात वावरतांना खंडोबा या देवतेचा प्रसार प्रचार करताना या समाजासमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे. मुरळी बनण्यावर कायद्याने बंदी असली तरी अवैध रीतीने ही अनिष्ट प्रथा पाळली जाताना दिसते. या मुरळ्या नंतर उघड-उघड वेश्या व्यवसाय करताना दिसतात . जागरणा मधील भक्तिभावना भावना कमी होऊन त्याला बाजारू सवंगपणा आलेला दिसून येतो. अस्थिरता, निरक्षरता, अशिक्षितपणा अशा प्रश्नाने वाघ्येदेखील घेतले गेलेले आहेत. मुरळीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी अथक प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. बाबा आढाव, अनिल अवचट ,अंधश्रद्धा निर्मूलन संस्था सतत या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार, प्रचार करीत आहेत. काही वाघ्ये सुशिक्षित होऊन व्यवसाय करीत असल्याचे दिसतात. देवाची सेवा करण्यासाठी सोडलेली मुले, त्यांनी बनलेला समाज खरे तर एक लोककला जिवंत ठेवून पुढील पिढीकडे सुपूर्द करीत आहेत. गरज आहे ती यामधील अनिष्ट गोष्टींचे हीण नाहीसे होण्याची. तेव्हाच ही लोककला चमकेल आणि वाघ्या-मुरळीच्या आयुष्याचे सोने होईल!!

Theme: Overlay by Kaira