वराह अवतार

Varah Avatar

हिंदू धर्मानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह (सूकर) हा अवतार तिसरा मानला जातो. या वराहाचे तीन अवतारांमध्ये विभाजन केलेले दिसून येते. त्याचा काल पद्म कल्पाच्या अंतापासून ते कलियुगापर्यंत मानला जातो. या वराह अवताराचे नील वराह, वराह आणि श्वेत वराह असे तीन वराहकाल मानले जातात.

प्राचीन काळी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी नेऊन समुद्रात लपवली. पृथ्वीवर संकट आले असता ब्रह्मदेवाच्या नाकातून श्री विष्णू वराह रूपात प्रकट झाले. तीक्ष्ण घ्राणेंद्रिये हे या वराहाचे वैशिष्ट्य होते. आपल्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियांद्वारे या वराहाने पृथ्वीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा पृथ्वी समुद्राखाली पाताळात असल्याचे वराहाच्या लक्षात आले. समुद्राच्या आतमध्ये जाऊन वराहाने आपल्या बळकट सुळ्यांवर पृथ्वी उचलून बाहेर आणली. हिरण्याक्ष दैत्याने हे सर्व पहिले आणि वराह रूपात असणाऱ्या विष्णुंना युद्धासाठी पुकारले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यावेळी वरहाने हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या खुरांनी पाणी स्तंभित करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली.

काही पौराणिक कथांनुसार या नंतर पृथ्वी आणि वारा वराहाचा विवाह झाला, त्यांच्या पुत्राचे नाव नरका. हा नरकासुर नरकाचा राजा बनला. पूर्वीचे प्राग्ज्योतिष कामरूप (आजचे आसाम) येथील काही हिंदू राजवंशीय आपण नरकासुराचे वंशज असल्याचे सांगतात.

भगवान वराहाचे अवतरण भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाले. त्यामुळे या दिवसास वराह जयंती असे मानले जाते. भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी वराह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मथुरा येथे भगवान वराहांचे प्राचीन मंदिर आहे, तेथे हा वराह जयंतीचा उत्सव साजरा होतो. तसेच तिरुमला येथे ‘भूवराह स्वामी मंदिर’ आहे, तेथे देखील हा वराह जयंतीचा उत्सव साजरा होतो. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह अशा तिघांचा एकत्रित काल हा वराह काल मानला जातो. वराह कालाची बीजे प्राचीन वैदिक संहितांमध्ये आढळून येतात. शाकुंतल मध्ये शकुंतला वराहाचे वर्णन ‘नागरमोथा’ या वनस्पतीची मुळे पुरविणारा असा करते. वराहाचे तीक्ष्ण सुळे जमीन सहजपणे उकरतात व थेट मुळापर्यंत पोहोचतात. हाच गुणधर्म पृथ्वीचा शोध घेताना त्याला उपयोगी पडला असावा.

नील विरहाची उत्पत्ती सांगताना असे सांगितले जाते की पद्मकल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला. त्यानंतर सूर्याची उष्णता वाढली. त्यामुळे पृथ्वीवरील वने वाळून गेली, समुद्राचे देखील पाणी आटले. निरनिराळे ज्वालामुखी जागृत झाले. या समुद्राच्या पाण्याचे प्रचंड ढग तयार होऊन अखंड मुसळधार पाऊस सुरु झाला. तेव्हा ब्रह्मदेवाला पृथ्वीची काळजी वाटली व त्यांनी विष्णूला अवतार घेण्याची आज्ञा केली. त्यावेळी श्री विष्णू वराह रूपात प्रकट झाले आणि त्यांनी पृथ्वीचा काही भाग जलमुक्त केला.

काही पुराणकारांच्या मते नील वराहाने आपली पत्नी नैना देवी आणि समस्त डुक्कर सेना सोबत घेऊन तीक्ष्ण दातांनी आणि दगडी कुदळींनी पृथ्वी समतल बनवली. पर्वत फोडून दगडांनी आणि मातीने खड्डे भरले आणि पृथ्वीस राहण्यायोग्य बनवले. त्यानंतरच पृथ्वीवर सुगंधित वने, पुष्करणी निर्माण झाले. याठिकाणी वराहाने आपल्या तीक्ष्ण आणि बळकट सुळ्यांचा एखाद्या शास्त्रप्रमाणे वापर केला. नील वराहासच यज्ञ वराह असे म्हणले जाते. कारण शून्यातून काहीतरी चांगले निर्माण करण्यासाठी त्याने जणू परिश्रमांचा यज्ञच प्रारंभ केला होता. आजही अनेक प्राचीन मंदिरांमध्ये आपल्याला डुक्कर सेनेची शिल्पे आढळून येतात.

या नंतरचा काळ येतो आदि वराहाचा. सुरुवातीला सांगितलेली हिरण्याक्षाची कथा आदि वराहाच्या काळातील. काही संशोधकांच्या मते हिरण्याक्षाचे दक्षिण हिंदुस्तानात राज्य होते आणि वराह नावाच्या आदिवासी जमातीमधील विष्णूशी त्याचे वैर होते. (विष्णु हे बहुदा त्या जमातीमधील राजसमान प्रमुख पद असावे) नील  वराहाने बनवलेल्या पृथ्वीची हिरण्याक्षाने चेष्टा आरंभिली. तेव्हा त्यांच्यात युद्ध होऊन वराहाचा विजय झाला. आजही दक्षिण भारतामध्ये हिंगोली, हिंगणघाट, हिंगणा नदी हिरण्याक्षाची आठवण करून देतात. एवढेच नव्हे तर हिरण्याक्ष गोत्रांची हेगडे नावाची माणसे देखील आहेत.

भगवान श्वेत वराहाचे राजा विमातीशी युद्ध झाल्याची कथा सांगितली जाते. द्रविड देशातील सुमती नावाच्या राजाने आपले राज्य मुलांवर सोपविले आणि तो तीर्थ यात्रेला गेला. तीर्थयात्रेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंत्रिगणांनी त्याच्या मुलाला, विमतीला सल्ला की सर्व तीर्थस्थानांची जी प्रमुख नगरी, तिचा नाश केल्यास तुमच्या पित्याला मोक्ष मिळेल. त्याच्या चढाईला घाबरून उत्तर भारतातील लोकांनी उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात निर्गमन केले. हा भाग तेव्हा देवलोक किंवा स्वर्गलोक म्हणून ओळखला जाई. तेथे गेलेल्या लोकांना श्वेत द्वीपावर श्वेत वराह रूपातील विष्णुचे दर्शन झाले. या श्वेत वराही रुपी विष्णुने शरण आलेल्या सर्व लोकांना अभय दिले आणि विमतीशी युद्ध करून त्याचा पराभव केला.

हे सर्व झाले पुराणांमध्ये सांगितलेल्या वराह अवताराबद्दल. परंतु या वराह अवताराबद्दल अजूनही काही रंजक माहिती तसेच त्यासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढील लेखात वाचा – वराह अवतार – भाग २

Theme: Overlay by Kaira