वर्षपूर्तीच्या निमित्ताने

नमस्कार वाचकवर्ग!! सर्वात प्रथम आपल्यासारख्या सुजाण आणि सूज्ञ वाचकांनी आमच्या www.sampannavarasa.com या वेबसाइटवरील विविध लेखांना दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार .

    अतिशय प्राचीन तरीही समृद्ध असणारा हिंदू धर्म बहुपेडी, बहुआयामी आहे . कोणत्याही बाबतीत कट्टरतावादी नसणारा हा धर्म परोपकार, सहिष्णुता, उदारता, मानवता या चार स्तंभांनी तोलून धरला आहे . या धर्मात धर्मशिक्षणाची कोणालाही जबरदस्ती नाही . प्रत्येक व्यक्तीला उपासना स्वातंत्र्य आहे . केवळ याच कारणास्तव हिंदू धर्मात स्त्री दैवते, पुरुष दैवते यांची उपासना तर करतातच तसेच निरनिराळे प्राणी देखील पूजेस पात्र आहेत . वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडीचे निमित्त साधून विशिष्ट पूजा प्रथा, परंपरा, रीतिरिवाज पाळले जातात . या सर्व सण उत्सवांमुळे परस्परांमधील प्रेमभावना वाढीस लागते . सकारात्मकता निर्माण होऊन ऐक्याची भावना वाढीस लागते . जीवनात दररोज सामोऱ्या येणाऱ्या ताण तणावावर मात करण्याची स्फूर्ती मिळते .

    महाराष्ट्र हे महान व्यक्तींचे राज्य असून पराक्रम, दिलदारपणा, बंधुता हे महाराष्ट्रीय व्यक्तीचे गुणधर्म आहेत . महाराष्ट्रीय संस्कृती समृद्ध, विशाल, आणि वैभवशाली असून अनेक परंपरा, रीतिरिवाज चालीरीती येथे पाळल्या जातात . आज मात्र दुर्दैवाने या परंपरांना धक्का पोचत असून विकृत वळण लागताना दिसत आहे . आषाढाचा महिना विठुरायाच्या वारीचा म्हणून ओळखला जाण्यापेक्षा लोक गटारी अमावस्येची आतुरतेने वाट पाहताना दिसतात . डाव्या विचारसरणीच्या काही लोकांकडून विविध वेबसाईट वरील लिखाणामधून जहरी द्वेषाची गरळ ओकली जात आहे. अनेक चांगल्या गोष्टी, काही सण साजरे करण्यामागील शास्त्रीय, सांस्कृतिक बैठक लक्षात न घेता अशा गोष्टी विपर्यस्त आणि विकृत स्वरूपात समाजासमोर मांडल्या जात आहेत .

    आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा परंपरांचे जतन करणे, त्यांचे स्वरूप, त्या साजरे करण्यामागील संकल्पना सर्वांसमोर मांडण्याचे काम आम्ही या www.sampannavarasa.com साईटद्वारे करीत आहोत . उच्च सांस्कृतिक मूल्ये असणाऱ्या या प्रथा परंपरामधील गाभा समजून सांगणे आणि कर्मकांडाचा अनावश्यक भाग कमी करणे असा दुहेरी हेतू या वेबसाईट वरील लेखांमधून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे .

    चैत्रगौरी, चैत्रांगण, पितृपक्ष, कावळ्यासंदर्भातील तथ्ये, कर्णाची गोष्ट अशा अनेक रंजक लेखांना वाचकवर्गाने उचलून धरले . तसेच कालप्रवाहात क्षीण होत चाललेल्या लोककलाकारांच्या लेखांना ( पिंगळा, वासुदेव, चित्रकथी, पोतराज ) उदंड प्रतिसाद मिळाला . विष्णू दशावतारांची माहिती, दुर्गेची नऊ रूपे, या लेखांनी पौराणिक बाजू उचलून धरली. देववाणी संस्कृतमधील निरनिराळी सुभाषिते या वेबसाईटवर अर्थ आणि विवेचनासहित प्रसिद्ध केली गेली . मे महिन्यात करोनामुळे टाळेबंदी असताना छोट्या दोस्तांसाठी रंजक गोष्टी प्रसिद्ध केल्या गेल्या .

    आज सर्वत्र ज्ञानभाषा इंग्रजीच्या प्रभाव आणि दबावाखाली मायमराठीचा श्वास गुदमरु नये, हिंदू महाराष्ट्रातील हा संपन्न वारसा पुढील पिढीच्या हाती सोपवताना या सर्वांचे दस्तावेजीकरण करणे हा महत्त्वाचा हेतू ही वेबसाईट निर्माण करताना होता . त्याच दृष्टीने पुढे देखील वाटचाल आपल्या सहकार्याने चालू राहील .

    गेल्या वर्षभर सर्वच जण करोना संकटाच्या सावटाखाली वावरत आहेत. अनेक मौल्यवान रत्ने या करोनाने आपल्यामधून हिरावून नेली. वारंवार होणाऱ्या टाळेबंदीमुळे जीवन अस्ताव्यस्त आणि दिशाहीन झाल्यासारखे वाटत असताना देखील निरनिराळे विषय शोधून त्याची समर्पक माहिती वाचकांपर्यंत पोचवताना वेगळीच ऊर्जा प्राप्त होत होती.

    बाहेर चिंताग्रस्त वातावरण असताना देखील सर्व सण – वार, व्रतवैकल्ये घरगुती वातावरणात तरीही उत्साहाने साजरे झाले. मला वाटते यातच आपल्या मराठी संपन्न वारशाचे चिरंतनत्व आहे. असो.

    आपला असाच लोभ आमच्यावर असू द्यावा. निरनिराळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखांद्वारे आपण असेच भेटत राहू.

    पुनःश्च धन्यवाद !!

One thought on “वर्षपूर्तीच्या निमित्ताने

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira