वटपौर्णिमा

वटमुले स्थिते ब्रह्मा , वटमध्ये जनार्दन:।

वटाग्रे तू शिवो देव: ,सावित्री वटसंश्रिता ।।

   होय, वडाची आठवण येण्याचे कारण तुम्हीदेखील ओळखले. ‘वटपौर्णिमा’. संपूर्ण भारतातील हिंदू स्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस. यालाच ‘वटसावित्री’ देखील म्हणतात. 

   आपली भारतीय परंपरा थोर असून त्यामधील व्रत, वैकल्ये ,सण -वार यांचा विचार केला तर सर्व सण प्रतीकात्मक रूपांत साजरे केले जातात असे दिसून येते. पौराणिक दृष्टीने पाहिले तर या व्रताचे ब्रह्मा हे मुख्य दैवत असून ,सावित्री -सत्यवान ,नारद ,यमधर्म या उपांग देवता आहेत. सावित्री या चतुर ,चाणाक्ष स्त्रीने याच झाडाखाली तीन दिवसांचे व्रत ठेऊन आपल्या पतीचे ‘सत्यवानाचे ‘ प्राण वाचविले. याच परंपरेचे  जतन करीत वटपौर्णिमेला सर्व हिंदू भारतीय स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी दीर्घायुष्य मागतात. 

    चार वेदांपैकी ऋग्वेद ,अथर्ववेद यांमध्ये वडाच्या झाडाचा उल्लेख आढळतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात श्रीविष्णू वटपत्रावर बालरुपात शयन करतात अशी समजूत आहे. वटवृक्षाला ब्रह्मदेवांचे निवासस्थान मानले जाते. हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. कुरुक्षेत्रावर देवांनी महायज्ञ करताना सोमचमसाचे (कातड्याचे सोमरस पात्र) मुख खालच्या बाजूला करून ठेवले, त्या सोमचामसचा वटवृक्ष तयार झाला अशी वटवृक्षाची उत्पत्ती ‘शतपथ ब्राह्मणात ‘ आढळून येते. 

    हा सर्व पौराणिक संदर्भ झाला. परंतु आधुनिक शास्त्रानुसार वडाचे माहात्म्य जाणून घेण्याची आज जास्त गरज आहे आणि ते जाणून घेताना चतुर सावित्रीने वडाचीच निवड का केली हे आपोआप स्पष्ट होईल. वडाला भारताचा राष्ट्रीय वृक्ष मानले जाते. वडाचे मूळ स्थान हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या अरण्यात आहे. भरपूर छाया ,प्रचंड विस्तार असणाऱ्या वडाच्या झाडाला मूळपुरुषाची ,कुटुंबप्रमुखाची उपमा देतात. संसारवृक्षाचे प्रतीक मानले गेलेला वटवृक्ष गीताजन्माचा एकमेव साक्षीदार आहे. वटवृक्षाच्या प्रत्येक फांदी ,पारंबी व पानातून नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणूनच त्याला  ‘अक्षयवट ‘ असे सार्थ नामाभिधान देण्यात आले आहे. वटवृक्षाची आयुर्मर्यादा भरपूर असते. भारतात तसेच भारताबाहेर देखील प्रचंड विस्ताराची वडाची झाडे आपणांस दिसून येतात. सातारा तसेच अकोले येथील पेमगिरी येथे ६५० वर्षे जुना वटवृक्ष आहे.  चंदनपुरी घाटात देखील आपणास विशाल वटवृक्ष दिसून येतो.

   कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डेनमध्ये अतिविशाल परिघाचा वटवृक्ष आहे. तसेच गुजरातमध्ये देखील ‘कबीरवड ‘ नावाचा एक महाकाय वटवृक्ष आहे . प्लिनी याने वटवृक्षाचे वर्णन ‘इंडियन किंग ट्री ‘ असे केले आहे. साधुसंतांनी याचे महत्त्व नक्कीच जाणले होते. अनेक लोकांचे श्रद्धास्थान असणारे श्री अक्कलकोट स्वामी ‘वटवृक्ष स्वामी’ म्हणून ओळखले जातात. आजही अक्कलकोट येथे त्या पवित्र विभूतीचा निकटस्पर्श लाभलेला वटवृक्ष आपण पाहू शकतो. तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तो वृक्षसुद्धा वडच होता. या काही महत्त्वाच्या घटनांचा साथीदार असणाऱ्या वटवृक्षात नक्कीच काही अलौकिक तत्त्वे आहेत. या वृक्षाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर भारतीय परंपरांच्या प्रतिकात्मकतेचा  आदर वाटल्यावाचून रहात नाही. 

   शास्रीय दृष्ट्या वडाचे झाड इतर झाडांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे ६०% प्राणवायू हवेत सोडतो. पूर्ण वाढलेले वडाचे झाड दार तासाला ७१२किलो प्राणवायू हवेत सोडते. म्हणूनच सावित्रीने मूर्च्छित सत्यवानाला वडाखाली झोपविले.

   आकाशातून धावणाऱ्या ढगातून पाणी खेचून आणण्याची अफाट ताकद वटवृक्षात दिसून येते. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होण्याच्या सुमाराला असे वैशिष्ट्य असणाऱ्या झाडाची पूजा करून त्याप्रती आपले ऋण व्यक्त करणारी भारतीय संस्कृती. पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांवर वडाची अनेक अंगे प्रभावी औषध म्हणून काम करतात. वडाच्या चिकाला एखाद्या मलमाचे महत्त्व आहे. तळपायाच्या भेगा,चिखल्या यावर हा चीक गुणकारी असतो. पाऊस पाण्यात निघणाऱ्या विंचवाच्या विषावर उतारा म्हणून हा चीक वापरतात. वडाच्या पारंब्यांचा रस जंतांवर अतिशय उपयुक्त असतो. तसेच या चिकाला असणाऱ्या विशिष्ट वासामुळे किडे मुंग्या जवळ येत नाहीत. त्यामुळे साधू लोक दाढी जटांनां वडाचा चीक लावताना दिसतात. वटवृक्ष ही एक यज्ञीय वृक्ष असून त्याच्या समिधा होमात अर्पण करतात. तसेच यज्ञपात्रे तयार करतांना वडाचे लाकूड वापरतात. 

   ’कृष्णवट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाची पाने किंचित वाकलेली ,द्रोणासारखी असतात. त्याला ‘कृष्णाज बटर कप ‘असे म्हटले जाते.  तसेच या वृक्षाच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण  बनविले जातात. 

   इतके सर्व गुणधर्म असणाऱ्या वटवृक्षाची एकाच दिवशी नव्हे तर रोजच पूजा व्हावी .संवर्धन व्हावे. परंतु विवाहित स्रीचा जिव्हाळ्याचा असणारा हा दिवस पर्यावरणप्रेमींच्या काळजाला घरे पाडतो . त्याचे पूजन ,संवर्धन,जतन सर्व विसरून त्याचे लचके तोडले जातात. त्याच्या फांद्या तोडून त्याला विद्रुप बनविले जाते. आणि इतका औषधी असणारा वृक्ष दुसऱ्या दिवशी कचरा होतो. खरंच असे करण्याची गरज आहे का?

   आपण आपल्यापुरता तरी संकल्प करूयात की संपूर्ण वृक्षाचे पूजन करीन,फांद्या न तोडता उलट किमान पाच वडाची रोपे लावून त्याचे जतन ,संवर्धन करीन ,पुढील पिढीला त्याचे महत्त्व समजून सांगीन,हीच खरी आधुनिक सावित्रीची वटपौर्णिमा असेल ना ?

2 thoughts on “वटपौर्णिमा

  1. खूप छान माहिती हे मात्र खरे आहे की या महान वृक्षाचे आज दिवशी संवर्धन कारण्याऐवजी लचके तोडतात.काही गोष्टी यात नव्याने समजल्या धन्यवाद

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira