विष्णु दशावतार

Vishnu Dashavtar

    सृष्ष्टीचक्र अव्याहतपणे सुरळीत चालावे याची विश्वनियंता नेहमीच काळजी घेतो. उत्पत्ती, स्थिती, लय या रहाटीवरून जग फिरत असते. उत्पत्तीचे कार्य ब्रह्माकडे, स्थिती म्हणजेच पालनपोषणाचे कार्य विष्णूकडे तर संहाराचे कार्य महेश्वर शंकराकडे. हे सृष्टिचक्र विनासायास फिरत राहण्यासाठी या तीनही तत्त्वांचा समन्वय योग्य रीतीने घडून येणे अत्यंत आवश्यक आहे.

    जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्टांचा प्रादुर्भाव वाढतो, दुष्ट सुष्टाच्या संघर्षात दुष्टाचे पारडे जड होते तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णू त्या काळच्या परिस्थितीशी अनुरूप असा अवतार धारण करतात. दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीचा भार हलका करतात. परमेश्वराने मानवी रूपात अथवा प्राणिरूपात एखादे कार्य पार पाडण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेणे याला हिंदू धर्मात ‘अवतार’ असे म्हणतात. ‘अवतारति इति अवतारः’ – अवतीर्ण होणे, वरून (स्वर्गातून) खाली (पृथ्वीवर) येणे म्हणजेच अवतार घेणे.

   श्रीमद्भग्वदगीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला वचन देताना स्पष्टच म्हणतात –

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तादात्मनं सृजम्याहम् ||

परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम् |

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

    असे दहा अवतार आपण या विभागातील लेखांमधून पाहू. या दशावतारांची माहिती अग्नी पुराण, गरुड पुराण, भागवत यामध्ये सापडते. तसेच पद्मनाभाचार्य स्वामींचे ‘श्री जातवेद महावाक्यांग’ मध्ये या दशावतारांची माहिती सांगणारा श्लोक आहे –

मच्छापासूनी चार स्वामी हरी, जो अवतार घेतो कृती

त्रेती वामन फर्श राम, तिसरा श्रीराम सीतापती,

द्वापारी कृष्णनाथ, बौध्य दुसरा पाळी स्वयं पांडवा,

कलीत अवतार एक हरीचा, कलंकी नमो केशवा

    परमेश्वराच्या अनंत कला असून त्यातील सोळा कला या विश्वाचा संसार चालवण्यासाठी पुरेशा असतात. श्रीकृष्ण हे सोळा कलायुक्त असल्यामुळे त्यांना ‘पूर्णावतार’ ‘पूर्णपुरुष’ मानतात. जेव्हा सोळा कलांमधील काही भाग घेऊन अवतार होतो तो अंशावतार आणि त्याहीपेक्षा कमी कला घेऊन जो अवतार होतो तो विभूती अवतार. असो.

    चैत्र शुद्ध तृतीया ही मत्स्य जयंती, श्री विष्णूच्या प्रथम अवताराची जयंती मानली जाते. त्यामुळे पुढील लेखात आपण ‘मत्स्य’ अवताराचे सविस्तर वर्णन पाहू. मत्स्य अवताराविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा – ‘मत्स्य अवतार’

    विष्णू दशावतारांविषयी वाचण्यासाठी ‘विष्णू दशावतार’ या विभागाला नक्की भेट द्या.

Theme: Overlay by Kaira