कूर्म अवतार – भाग १

    ‘मत्स्य’ अवताराविषयी माहिती आपण  ‘मत्स्य अवतार’ लेखात घेतली. आता दुसऱ्या अवताराविषयी जाणून घेऊ या. ‘कूर्म’ अथवा ‘कच्छप’ हा विष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. श्री विष्णुच्या या अवतार उत्पत्तीप्रीत्यर्थ वैशाख शुद्ध पौर्णिमेला ‘कूर्म’ जयंती साजरी केली जाते. आंध्र प्रदेशमध्ये श्रीकाकुलम येथे श्री कूर्मनाथ स्वामी मंदीर आहे. आपल्याकडे विविध पुराणांमधून आणि संतांच्या रचनांमधून कूर्मावताराचे उल्लेख आढळतात.

    श्री तुकाराम महाराज गाथा (अभंग २६४, ओवी ११२) मध्ये म्हणले आहे,

“अम्हासाठी अवतार, मत्स्यकूर्मादि सूकर

मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरीनाथा”

    श्री विष्णूंनी आमच्याचसाठी मत्स्य, कूर्म , सूकर असे अवतार घेतले. पंढरीनाथा अशी हाक मारताच विठूमाऊली आमच्यासाठी परमप्रीतीचा पान्हा सोडते. 

    शतपथ ब्राह्मण आणि पद्मपुराणात प्रजापतीने संतती निर्माणासाठी कासवाचे रूप घेऊन पाण्यात विहार केला,

    नृसिंह पुराणात दुसरा अवतार ‘कूर्म अवतार’ आहे असे सांगितले आहे तर भागवत पुराणात कूर्म अवतारास ११वा अवतार मानले आहे. 

    ह्या कूर्म अवतार उत्पत्तीची कथा सांगताना असे सांगतात की एकदा देवांचा राजा इंद्रावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी आपल्या गळ्यातील दिव्य फुलांची माला त्याला दिली. हत्तीवर आरूढ असणाऱ्या इंद्राने ती माळ हत्तीच्या माथ्यावर ठेवली असता ती खाली पडून हत्तीच्या पायाखाली तुडवली गेली. दुर्वास मुनींनी हा अपमान मानून इंद्राला ‘तुझे वैभव नष्ट होईल‘ असा शाप दिला. श्रीलक्ष्मी इंद्राला सोडून गेली. देव शक्तिहीन, निष्प्रभ झाले. असुरांसमोर देव तेजोहीन झाले. परंतु बली राजाच्या राज्यातील असुर शक्तीवान ठरत होते. शेवटी इंद्रासह सर्व देव विष्णुला शरण गेले. श्री विष्णूंनी क्षीरसागराचे मंथन करून अमृत प्राप्त करून त्याचे प्राशन केल्यास सुरगण प्रभावी ठरतील असे सांगितले. या समुद्रमंथनाच्या कमी गोड बोलून दैत्यांनाही सामील करून घेण्यास  त्यांनी सांगितले.

Samudramanthan
या प्रसंगी देवांनी मंदराचल पर्वत उपटून त्याची रवी बनवली. वासुकी नावाच्या नागाची दोरी करून त्याला वेढले. देवतांनी शेपटाकडील भागाकडून पकडले तर असुरांनी तोंडाकडील भागाला पकडले व देव-असुर समुद्रमंथन करू लागले. ‘पाण्यामध्ये घन पदार्थ बुडतोच’ या शास्त्रीय नियमानुसार मंदराचल पर्वत खोल खोल रसातळाला जाऊ लागला. तेव्हा श्री विष्णुंनी कूर्माचे रूप घेऊन सागराच्या तळाशी बसून आपल्या टणक कवचासारख्या पाठीवर बुडणारा मंदराचल पर्वत सावरला. समुद्रमंथन पूर्ण होऊन त्यातून चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये सर्वात शेवटी धन्वंतरी हातात अमृतकलश घेऊन प्रकट झाले. ज्या दिवशी विष्णुंनी कच्छरुप धारण करून मंदराचल पर्वतास आधार दिला तो दिवस ‘वैशाख पौर्णिमा’ होता.म्हणून त्यादिवशी कूर्म जयंती साजरी केली जाते. कूर्मावतार आणि त्यातील प्रतीकात्मक अर्थ याविषयी अधिक वाचा या लेखात – कूर्म अवतार – भाग २
Theme: Overlay by Kaira