नवदुर्गा

   सृष्टीमधे असणाऱ्या नवमितींवर अधिपत्य गाजवतात त्या नवदुर्गा. दुर्गा या शब्दातील दकार दैत्याचा नाश, उकार विघ्न नाश, रफार रोगहरण, गकार पापनाशन तर आकार भय आणि शत्रू यांचा नाश दर्शवितो. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ही देवीची मुख्य ३ तम्, सत्त्व आणि रजात्मक रूपे. यामधील प्रत्येक स्वरूपात इतर दोन रूपे मिसळून त्रिवृत्करण होऊन जी नवरूपे बनली त्याच नवदुर्गा. 

   शक्तितंत्रात नऊ या अंकाला अत्यंत महत्त्व आहे. दशमानातील सर्वात मोठा अंक ९ असून त्याची कितीही पट केली तरी त्यामधील अंकांची बेरीज शेवटी ९ च येते. पूर्ण हे कायम पूर्णातच विराम पावते. 

पार्वतीची ही नवरूपे नवधा प्रकृतीची निदर्शक आहेत. या नवधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूते, मन, चित्त, बुद्धी आणि अहं ही तत्त्वे यांचा समावेश होतो. याचमुळे नवरात्र, नवचंडी, नवमी, नवार्ण, नवग्रह हे सर्व नवात्मक आहेत. मानवी शरीरातील रंध्रे देखील ९ असून त्याद्वारे मानवी जीवनाचे चलनवलन चालते. 

   सत्त्व, रज, तम या स्वरूपामधून सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय साधणाऱ्या नवदुर्गांचा जागर करू या या नवरात्रीच्या शुभ पर्वामध्ये!

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चंद्राघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम् ।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतीच ।

सप्तमं कालरात्रीति  महागौरीति च अष्टमम् ।

नवामं सिद्धीदात्री च नवदुर्गा प्रकीर्तित: ।।

    शैलपुत्री ही नवदुर्गेमधील दुर्गेचे पहिले रूप. त्या विषयी वाचा ‘शैलपुत्री’ या लेखामध्ये!

Theme: Overlay by Kaira